म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ‘मुंब्र्यात फुसका बार आला आणि वाजलाच नाही, आमच्या कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना यू-टर्न घ्यावा लागला,’ असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात लगावला. ‘माज उतरवण्याची भाषा करणाऱ्यांना नागरिकच धडा शिकवतील. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नागरिकांनी ते दाखवून दिले आहे,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे मुंब्रा येथील शिवसेनेच्या वादग्रस्त शाखेवरून सुरू झालेला वाद चालू राहण्याची शक्यता आहे.

मुंब्र्यात शिंदे गटाने पाडकाम केलेल्या वादग्रस्त शाखेच्या जागेची पाहणी करण्यासाठी शनिवारी उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. या दौऱ्यावेळी शिंदे-ठाकरे गटाचे पदाधिकारी समोरासमोर आल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांच्या विनंतीनंतर अवघ्या काही मीटर अंतरावरून शाखेची पाहणी करून ठाकरे यांना माघारी परतावे लागले. त्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.

‘आम्ही तिथे शिस्तीत होतो, मात्र ते अर्धी मुंबई सोबत घेऊन आले. दिवाळीमध्ये काही विघ्न आणणे योग्य नाही. सत्तेत असताना कायम सण, उत्सवावर यांनी बंदी आणली, मात्र आम्ही ती बंदी उठवली. त्यामुळे काहींना ती पोटदुखी आहे आणि त्यामुळे काही जणांची प्रवृत्ती अशी आहे,’ असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दिवाळी पहाट कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्यातील सभेत केलेल्या टीकेलाही उत्तर दिले. ‘ते सात नंबर वर गेलेत पुढच्या निवडणुकीत ते दस नंबरी असतील,’ असा टोला त्यांनी लगावला.

‘राम मंदिराच्या उद्घाटनाला सर्वांनी जायचे’

जांभळी नाका चिंतामणी चौक येथील दिवाळी पहाट कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय श्रीराम’, ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणा दिल्या. या वेळी त्यांनी, ‘येत्या २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन आहे. आपण सर्वांनी जायचे आहे,’ असे आवाहन उपस्थित तरुणाईला केले. आपले सरकार आल्यानंतर सणांवावरील सर्व निर्बंध हटवण्यात आले. गोविंदा, गणपती, नवरात्र, दसरा उत्साहात झाले. दिवाळी जोरात झाल्याचे शिंदे यांनी नमूद करून, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *