‘बाप आणि लेकीला सोडा’ ही भाषा वापरणे अमानुष:संजय राऊतांचा अजित पवार गटावर घणाघात, म्हणाले – ठाकरे, पवारांना सोडून जाणारे रावणाचे वंशज
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या खासदारांना ऑफर दिली होती, अशा चर्चा आहेत. ‘बाप आणि लेकीला सोडा, अन् दादांसोबत चला’ असा सल्लाही दिल्याची माहिती आहे. यावर संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. अजित पवारांपासून ते सुनील तटकरे, प्रफुल पटेल या सगळ्यांना आज जे काही मिळाले, ते शरद पवार यांच्यामुळे मिळाले. त्यांची आज बाजारात जी किंमत आहे, ती शरद पवार यांनी केली. शरद पवारांनी कठीण परिस्थिती निवडून आणलेल्या खासदारांपैकी काही तिकडे जात असतील, तर ते रावणाचे वंशज आहेत, अश शब्दांत राऊत यांनी संताप व्यक्त केला. सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या खासदारांना दिलेल्या ऑफरमुळे राष्ट्रवादीमध्ये पुन्हा खळबळ माजली आहे. यावरून सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी नाराजी वर्तवली होती. दरम्यान, त्या खासदारांनी ही ऑफर धुडकावून लावल्याची माहिती आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना जोरदार हल्ला चढवला. बाप आणि लेकीला सोडा ही भाषा वापरणे अतिशय अमानुष
अजित पवारांपासून ते सुनील तटकरे, प्रफुल पटेल या सगळ्यांना आज जे काही मिळाले, ते शरद पवार यांच्यामुळे मिळाले. त्यांची आज बाजारात जी किंमत आहे, ती शरद पवार यांनी केली, असे राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत 40 चोर गेले, त्यांची किंमत ही शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळेच आहे. त्यामुळे ‘बाप आणि लेकीला सोडा, आमच्यासोबत या’ ही भाषा वापरणे अतिशय अमानुष असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. संतोष देशमुखचा खून जेवढा निर्घृण आहे, तेवढीच बाप आणि लेकीला सोडा ही भाषा क्रूर आणि निर्घृण असल्याचे राऊत म्हणाले. पितृतुल्य नेत्याने तुम्हाला या स्तरावर नेले, पण तुम्ही बाप-लेकीला सोडा, ही भाषा वापरण्यापर्यंत, या स्तरापर्यंत येता हे गंभीर आहे. केंद्रामध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी तुम्ही ही पातळी गाठता, ते क्रूर आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सुनील तटकरेंच्या विधानाचा समाचार घेत टीका केली. …तर ते कंस आणि रावणाचे वंशजच असतील
अमित शहांना खुश करण्यासाठी, मोगॅम्बोला खुश करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू असल्याची टीका राऊत यांनी केली. लोकसभा निवडणुकीत , ज्या कठीण परिस्थितीत शरद पवार यांनी कष्ट करून 8 खासदार निवडून आणले , त्यातले काही लोक सोडून जात असतील, तर ते रावणाचे वंशज आहेत, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांना कोणी सोडून जात असेल, कोणी पक्षातून फुटत असेल, तर ते कंस आणि रावणाचे वंशजच असतील, निर्घृण-अमानुष असतील, असे म्हणत संजय राऊतांनी रोष व्यक्त केला. मंत्र्यांना मराठीविषयी धडे देण्याची गरज
संजय राऊत यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या जीआरवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील मंत्र्यांना मराठी भाषा, संस्कृती, संस्कार, अस्मिता याविषयी धडे देण्याची गरज आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेसंदर्भातील घोषणा केली, पण आदेश निघाल्याशिवाय ते घोषणा करू शकत नाही. राज्य सरकारने तत्काळ केंद्राशी संवाद साधून यासंदर्भातील आदेश घ्यायला पाहिजे होता. पण राज्यातील संबंधित मंत्र्यांना मराठी भाषेच्या संवर्धनापेक्षा इतर काही महत्त्वाची कामे हातात असतील, त्यामुळे हा घोळ झाला असावा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. हे ही वाचा… दिल्लीची निवडणूक हा केवळ बहाणा:तिथे कुणीही जिंकले, तरी शहा-मोदी सरकार चालवतील; संजय राऊतांची टीका काँग्रेस देशात मोठा पक्ष आहे, परंतु दिल्लीत आप मोठा पक्ष आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीची ताकद सर्वाधिक आहे. काँग्रेस आणि आप इंडिया आघाडीचा भाग आहेत. केजरीवाल सारख्या नेत्यावर खोटे आरोप करून प्रचार करणे, याच्याशी आम्ही सहमत नाही. लोकसभा निवणुकीत आम्ही एकत्र लढलो, पण दिल्ली विधानसभेची स्थिती वेगळी आहे. तेथे कुणीशी जिंकले, तरी अमित शहा किंवा नरेंद्र मोदी सरकार चालवतील. निवडणूक हा बहाणा आहे. हे लोक कुणालाही काम करू देणार नाहीत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सविस्तर वाचा…