या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान विठ्ठल राऊत (वय ३२, रा. शिवना तालुका सिल्लोड, जि. संभाजीनगर) असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे. समाधान हा शिक्षित असून त्याचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. समाधान हा रोजगारासाठी पुणे येथील हॉटेलमध्ये नोकरी करत होता. दरम्यान, समाधानच्या आई काही दिवसांपासून आजारी होती. कुटुंबीयांनी ही बाब समाधानला सांगितल्यानंतर समाधानने हॉटेल मालकाकडून सुट्टी घेऊन शुक्रवारी पहाटे तो आईला भेटण्यासाठी दुचाकीकीने (एमएच १४ जीएक्स ४४९७) छत्रपती संभाजीनगरकडे निघाला.
संभाजीनगरला पोहोचल्यानंतर संभाजीनगर – जळगाव महामार्गावर सिल्लोडच्या दिशेने जात असताना फुलंब्री गावाच्या समोर असलेल्या फरशी फाटा येथे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास समाधानच्या दुचाकीच्या समोरून येणाऱ्या (एमएच ०२ सीआर ३०२२) या कारने जोराची धडक दिली. यामध्ये समाधान गंभीर जखमी झाला. दरम्यान, त्याला नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आजारी असल्यामुळे मुलगा भेटण्यासाठी येत असल्याची वाट पाहणाऱ्या आईल मुलाचा मृतदेह पाहण्याची वेळ आली. यामुळे माऊलीने हंबरडा फोडला. दरम्यान, समाधानचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे. बाजार पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक रवी देशमुख करत आहेत.