वाल्मीक कराडची PSI सोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल:एका मुलाला वाचवण्याचे आदेश, बीड जिल्ह्याचा बाप असल्याचा शब्दप्रयोग

वाल्मीक कराडची PSI सोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल:एका मुलाला वाचवण्याचे आदेश, बीड जिल्ह्याचा बाप असल्याचा शब्दप्रयोग

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आधीच अडचणीत आलेल्या वाल्मीक कराडचा पाय आता आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. वाल्मीक कराड आणि पोलिस अधिकाऱ्याच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओमध्ये वाल्मीक कराड हा ‘किरकोळ गुन्हा आहे. आपला पोरगा आहे. जाऊद्या द्या सोडून..’ तसेच ‘मी बीड जिल्ह्याचा बाप आहे. मी असल्यावर चिंता काय’ असे पोलिस अधिकाऱ्याला सांगत असल्याचे ऐकू येते. या ऑडिओ क्लिपमुळे वाल्मीक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वाल्मीक कराड आणि पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे यांच्यात होत असलेल्या संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मीक कराड एका मुलाला वाचविण्याचा आदेश तत्कालीन सायबर सेलच्या पोलिस उपनिरीक्षकांना देत आहे. नाशिक येथील एका कार्यकर्त्याला बीड पोलिसांनी फोन केला होता. त्यामुळे त्याने वाल्मीक कराडकडे मदत मागितली. यानंतर वाल्मीकने थेट महिला पोलिसाला फोन करुन कार्यकर्त्याला त्रास न देता प्रकरण सोडून देण्याचा सल्ला दिला. मात्र, या ऑडिओ क्लिपची पुष्टी केली जात नाही. ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय?
एक मुलगा वाल्मीक कराड याला फोन करून ‘मला सतत पोलिसांचा फोन येतोय’, अशी तक्रार करतो. त्यावर मला त्या पोलिस स्टेशनमधील संबंधित व्यक्तीचा नंबर दे, असे वाल्मीक म्हणतो. समोरील मुलगा तातडीने सायबर सेलच्या पोलिस उपनिरीक्षकाचा नंबर देतो. मी जिल्ह्याचा बाप, कशाला चिंता करता
वाल्मीकही लगेच पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे यांना फोन करतो. मॅडम किरकोळ गुन्हा आहे. मी येथे बसलोय, आपलंच पोरगं आहे, द्या सोडून…. असे थेट आदेश वाल्मीक कराड पीएसआय निशिगंधा यांना देतो. त्यावर समाज माध्यमांवरील मजकुराचा (सोशल मीडिया पोस्ट) उल्लेख करत तो आक्षेपार्ह असल्याचे पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा वाल्मीकला सांगतात. त्यावर मी बीड जिल्ह्याचा बाप आहे, तुम्ही कशाला चिंता करताय… आपलंच पोरगं आहे, द्या सोडून…. असे वाल्मीक पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा यांना सांगतो. याआधीची एक ऑडिओ क्लिप झाली व्हायरल
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वाल्मीक कराडची पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्यासोबतची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. सनी आठवले नावाच्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी वाल्मिकने फोन केला होता. पोलिसांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले आहेत. शितलकुमार बल्लाळ यांनी समोर येऊन आपली भूमिका मांडली. ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नसून कुणीतरी एआयच्या माध्यमातून हे बनवले असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता मंगळवारी एक नवीन ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये तो आपण बीडचा बाप असल्याचे म्हणत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment