वाल्मीक कराडला त्याच्या जवळच्यांकडूनच धोका:त्यावर धनंजय मुंडेंनी उत्तर द्यावे; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे आवाहन
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणात संशयित वाल्मीक कराड याच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला जात आहे. त्याला त्याच्या जवळच्यांकडूनच धोका असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. या संदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले की, कालच कराडने सांगितले की माझ्या जीवाला धोका आहे. पोलिस तुमचे, सरकार तुमचे आणि जेलही तुमचेच, मग कराडला धोका कोणापासून आहे? जेलमध्ये कराड सांगतो की माझ्यासाठी सेवक ठेवा, माझ्या जीवाला धोका आहे. याचे उत्तर धनंजय मुंडे यांनी दिले पाहिजे. खरेच त्याच्या जीवाला धोका आहे का? आणि असेल तर कोणापासून आहे? याची माहिती घेतली पाहिजे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. या संदर्भात वडेट्टीवार म्हणाले की, कराडच्या जीवाला धोका हा सत्ताधाऱ्यांकडून आणि जवळच्यांकडून वाटतो. ज्यांच्यापर्यंत चौकशीचे धागेदोरे जात आहेत, लोक ज्यांच्याकडे बोट दाखवत आहे. त्यांच्यापासून त्याला भीती वाटत असेल, कारण विरोधकांकडून भीती वाटण्याचा काही प्रश्नच नाही. एकदाच हे पाप धुतले जावे आणि आपण स्वच्छ होऊन बाहेर पडावे, अशी सत्तेत बसलेल्या लोकांची इच्छा असेल. त्यामुळे त्याला संपवुन मुळासकट पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असेही वडेट्टीवारांनी म्हटले आहे. कोणाचीतरी विकेट जाईल मंत्रीमंडळामध्ये अजित पवारांकडे जागा शिल्लक नाही, त्यांनी सर्व जागा भरुन टाकलेल्या आहेत. कोणालातरी काढल्याशिवाय मंत्रीमंडळामध्ये राष्ट्रवादीमधून भुडबळांचा नंबर कसा लागेल? असा प्रश्न वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे महिनाभरात कोणाचीतरी विकेट जाईल, असा विश्वास विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केला आहे. लाडकी बहीण योजना हळुहळु गुंडाळली जाईल लाडकी बहिण योजनेबद्दल वडेट्टीवार म्हणाले की, आधी एका कुटुंबामध्ये चार – चार जणांना पैसे का दिले, ते मते घेण्यासाठी दिले आहेत. आता ते का फिरवता आहे? असा प्रश्न विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला. हे किती बनावट खोटे आहेत, धोकेबाज आहेत, फसवे आहेत. बहीणींना कसे भावनेने खेळवून त्यांच्याकडून मते घेतली, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील बहिणी यांना त्यांची जागा दाखवून देतील. निम्म्यापासून अधिक महिलांना या योजनेपासून वंचित ठेवले जाईल आणि ही योजना हळुहळु गुंडाळली जाईल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.