विजयही ऐतिहासिक अन् पराभवही…:महायुतीच्या विजयामागे तीन कारणे प्रमुख
महाराष्ट्रात हे काय झाले? सारे काही ऐतिहासिक. महायुती, विशेषत: भाजपचा एेतिहासिक विजय अन् आघाडीचा ऐतिहासिक पराभव. निकालाच्या आदल्या दिवशीपर्यंत महायुतीच्या नेत्यांचीही १६५ जागांच्या पुढे जीभ रेटत नव्हती. कुणालाही अंदाज नव्हता की अंडरकरंट काय चाललाय? या ऐतिहासिक विजयामागे तीन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे – लाडकी बहीण या योजनेत जुलैपासून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यास महायुतीने सुरुवात केली होती. ही संख्या मध्य प्रदेशपेक्षा दुप्पट आहे. मध्य प्रदेशात १.३ कोटी महिला लाभार्थी होत्या, महाराष्ट्रात अडीच कोटी महिलांना लाभ मिळाला. हे आश्वासन आघाडीनेही दिले होते; पण जे आधीपासून पैसे देत आहेत त्यांच्यावरच महिलांनी विश्वास ठेवला. याच कारणामुळे अनेक विधानसभा मतदारसंघांत महिलांचा मतटक्का २०१९ च्या तुलनेत आता १२ ते ४० टक्क्यांनी वाढला. मतटक्का तर पुुरुषांचाही वाढला; पण ते प्रमाण कमाल २७ % पर्यंतच होते. राज्याच्या इतिहासात प्रथमच निम्न मध्यमवर्गाच्या महिलांनी घरातील कर्त्या पुरुषाचे एेकले नाही. पुरुषांनी जेव्हा त्यांना कुणाला मतदान करायचे हे सांगितले तेव्हा महिलांनी ‘तुम्ही आम्हाला दरमहा १५०० रुपये खर्चाला देता का?’ असे सांगून त्यांना गपगार केले. दुसरे कारण म्हणजे स्थिर सरकार
महाराष्ट्रातील जनतेला दलबदलू नेते व वारंवार सत्ताबदलाच्या राजकारणाचा उबग आला होता. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी त्यांनी केंद्रात ज्यांचे सरकार आहे त्यांनाच निवडले. तिसरे कारण जे हरियाणात झाले तेच एक विरुद्ध इतर सर्वांची एकजूट. जसे हरियाणात जाट समाज व्होकल आहे, तसाच महाराष्ट्रातही मराठा समाज. इकडे मराठेतर समाज एक झाला होता. राजकीय नेते व विश्लेषकांना याची खबरबातही नव्हती की.. अखेर ग्राउंडवर नेमके काय चाललेय?”