पाटणा : बिहारमध्ये राज्य भाजपच्या कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पाटणा शहरात पोहोचले आहेत. नड्डा यांच्या स्वागताला पोहोचलेले कार्यकर्ते आपाआपसात भिडले. भाजप कार्यकर्त्यांच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी दोन्ही बाजूनं लाठ्या काठ्यांचा वापर करण्यात आला. अखेर दोन्ही बाजूच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि त्यांना पांगवण्यात यश मिळवलं.
भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची रॅली पाटणा उच्च न्यायालयाच्या पुढे आल्यानंतर दानापूरच्या माजी आमदार आशा सिन्हा आणि भाजप नेते जीवन कुमार यांच्या समर्थकांमध्ये स्टेजवर जाण्यावरुन वाद झाला. या वादाचं रुपांतर पुढे मारामारीत झालं. दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते रस्त्यावरचं भिडले. भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाठ्या काठ्यांनी मारहाण देखील केली.