विराटच्या या विक्रमी शतकी खेळीत अनेक विक्रमांची नोंद झाली. सचिनच्या शतकांचा विक्रम मागे टाकताना विराटने त्याचा आणखी एक रेकॉर्ड मोडला. एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिनच्या नावावर होता. हा विक्रम आता विराटच्या नावावर झाला आहे. विराटने सचिनचा २००३ मधील ६७३ धावांचा विक्रम मागे टाकला. विराटने ११३ चेंडूत २ षटकार आणि ९ चौकारांसह ११७ धावा केल्या.
या विक्रमासोबत विराटने स्वत:वरील एक सर्वात मोठा अपयशाचा कलंक पुसला. विराट कोहलीला नॉकआउट स्पर्धेत कधीच मोठी धावसंख्या करता आली नव्हती. २०११ पासून विराटने ३ सेमीफायनल खेळल्या होत्या आणि यातील एकाही लढतीत त्याला दुहेरी धावसंख्या करता आली नव्हती. २०११च्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने फक्त ९ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१५च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १ आणि न्यूझीलंडविरुद्ध २०१९ साली फक्त १ धाव करता आली होती.
विराट सेमीफायनल किंवा नॉकआउट सामन्यात मोठी खेळी करू शकत नाही अशी टीका नेहमी त्याच्यावर केली जात होती. यावेळी मात्र विराटने इतिहास बदलला. विराटने फक्त न्यूझीलंडला धडा शिकवला नाही तर टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले.
वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये विराट कोहलीची कामगिरी
२०११- विरुद्ध पाकिस्तान- ०९
२०१५- विरुद्ध ऑस्ट्रेलिया- ०१
२०१९- विरुद्ध न्यूझीलंड- ०१
२०२३- विरुद्ध न्यूझीलंड- ११७
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकात ४ बाद ३९७ धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून विराट कोहली, श्रेयस अय्यर यांनी अनुक्रमे ११७ आणि १०५ धावा केल्या. शुभमन गिलने नाबाद ८०, केएल राहुलने नाबाद ३९ तर रोहित शर्माने ४७ धावांचे योगदान दिले.
Read Latest Sports News And Marathi News