भारताने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सर्वाधिक धावा केल्या. त्यात कोहली, श्रेयसचा मोलाचा वाटा राहिला. कोहलीची फटक्यांची पेरणी अचुक होती, तसेच त्याने एकेरी दुहेरी धावा घेण्याची संधीही सोडली नाही. श्रेयसने तर चौकार, षटकारांची माळच लावली होती. त्या दोघांनी चेंडू काहीसा कमी वेगाने येणाऱ्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज प्रभावी ठरणार नाहीत याकडे लक्ष दिले. कर्णधार रोहित शर्माने विराट-श्रेयसची तोंडभरून स्तुती केली.
नेहमीप्रमाणेच या सामन्यातही विराट कोहलीने चमकदार कामगिरी केली. त्याने आपली ट्रेडमार्क इनिंग खेळली आहे. त्याने आज खूपच शानदार फलंदाजी केली. याशिवाय अय्यरने विश्वचषक स्पर्धेत जो बहारदार खेळ केला आहे, त्यामुळे मी खूश आहे. संघाला गरज असेल तिथे अय्यर उभा राहतोय. आक्रमक खेळ खेळतोय. शुबमन गिल माझ्यासोबत खेलताना ज्या पद्धतीने फ्रंटफूट शॉट खेळतोय, ते अप्रतिम आहे.
रोहितनेही न्यूझीलंडचे कौतुक केले. मिचेल आणि विल्यमसन यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी मारलेल्या अप्रतिम फटक्यांमुळे काही काळ आम्हाला शांत राहावे लागले. आमच्यावर दबाव असेल याची आम्हाला पुरेपूर कल्पना होती. पण शेवटी कार्य सुफळ संपन्न झालं, याचा आनंद आहे. मोहम्मद शामीने शानदार कामगिरी केली. एकूणच फलंदाजीही उत्कृष्ट झाली. हेच टेम्प्लेट आहे ज्यावर आपण पुढे जाऊ इच्छितो, असं रोहित म्हणाला.
श्रेयस अय्यर म्हणाला, रोहितने टोन सेट केला आहे. तो आम्हाला सातत्यपूर्व जलद सुरुवात करून देतो आहे. तो निडर कर्णधार आहे. विश्वचषकात माझी सुरुवात चांगली झाली नाही. संघाने मला प्रोत्साहन दिले, त्यांनी मला सांगितले की काळजी करू नको. आम्ही तुला पाठिंबा देतो.फक्त तू तुझा सर्वोत्तम खेळ दाखव. ४०-५० हजार लोकांसमोर खेळायला मजा येते. जर तुम्ही चांगली कामगिरी केली तर ते तुम्हाला प्रोत्साहन देतात.
सध्या टीम इंडियाचे मनोबल उंचावले आहे. आता टीम इंडियाला अंतिम सामना खेळायचा आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा शानदार सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. या अंतिम फेरीत भारताचा सामना दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या संघाशी म्हणजे ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेशी होईल.