मतदान जनजागृती, वॉल ऑफ प्राऊड वोटर्स ठरतेय प्रेरणादायी:जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर चित्र प्रदर्शन; नागरिकांचे वेधतेय लक्ष

मतदान जनजागृती, वॉल ऑफ प्राऊड वोटर्स ठरतेय प्रेरणादायी:जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर चित्र प्रदर्शन; नागरिकांचे वेधतेय लक्ष

राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे ११ दिवस शिल्लक उरले आहेत. निवडणूक रिंगणातील उमेदवारांसोबतच जिल्हा परिषद प्रशासनही निवडणुकीची टक्केवारी वाढण्यासाठी विविध प्रयोगांची मालिका राबवत आहे. जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयात म्हणजेच जिल्हा परिषदेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकास मतदान करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी जि. प.च्या प्रवेश द्वारापासून ते आतपर्यंत ३४ विविध प्रेरणादायी पोस्टर प्रदर्शन लावले आहे. ते येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. एखादा कलावंत ज्याप्रमाणे त्याची कला कॅन्व्हासवर साकारून त्याच्या कलेचे प्रदर्शन भरवतो, त्याच धर्तीवर या पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत व विधानसभा निवडणुकीसाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तीची व सामाजिक संघटनांची दखल जिल्हा परिषदेने घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र व स्वीय सहायक ज्ञानेश्वर घाटे यांच्या संकल्पनेतून वॉल ऑफ प्राऊड वोटर्स निर्माण करण्यात आले. यात जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी, बचत गटातील काम करणाऱ्या महिला, दिव्यांग मतदारांना मतदानासाठी सहकार्य करणारे वॉरियर्स, ईव्हीएमद्वारा मतदान कसे करायचे याबाबत मार्गदर्शन करणारे स्वयंसेवक, महिला दिनाच्या औचित्यावर रॅली काढणाऱ्या रणरागिणी, मतदानासाठी सजगतेने कर्तव्य निभावणारे पोलिस, ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी सेविकांचा पिंक फोर्स, पथनाट्य करणारे रंगकर्मी, बीएलओ म्हणून काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, स्वीप अभियानातील कर्मचारी, गुलाबी मतदान केंद्रातील कर्मचारी तसेच मतदानाला प्रेरित करणारे स्लोगन आदी विविध ३४ पोस्टर्सचे प्रदर्शन भरवण्यात आले. प्रवेशापासून ही खुली वॉल ऑफ प्राऊड वोटर्स प्रदर्शनासह निवडणूक विभागाद्वारे १८ वरीस मोक्याचे, इथे सर्व बोटे सारखीच असे जनजागृती करणारे मोठे बॅनर झळकले आहे. ही संकल्पना जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजीता महापात्र, ज्ञानेश्वर घाटे, संजय राठी, राजेश सावरकर, हेमंतकुमार यावले, नितीन माहोरे, श्रीकांत मेश्राम, आदित्य तायडे, गजानन कोरडे, अतुल देशमुख आदींसह चमूची आहे. अमरावती जिल्ह्यातील विधानसभा मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रत्येक स्वीप नोडल अधिकाऱ्यांद्वारे सर्वात कमी मतदान झालेल्या भागात जनजागृतीवर विशेष भर देण्यात येत आहे. स्वीप कक्ष अंतर्गत अमरावतीत वोटोबा हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांच्या स्टेटसवर वोटोबासह २० नोव्हेंबरला ‘मी मतदान करणार’ असल्याच्या नवनवीन पोस्ट झळकत आहेत. अमरावतीचा वोटोबा ठरतोय चर्चेचा विषय

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment