पुणे : दिवाळी सुरू झाल्याने पुणेकर थंडीच्या प्रतीक्षेत असताना शुक्रवारी संध्याकाळी पावसाच्या जोराच्या सरींनी शहरात चौफेर हजेरी लावली. वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटात कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पाणी साचले होते. बाजारपेठेत खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसामुळे धांदल उडाली.

गडगडाटासह सरी

वातावरणातील घडामोडींमुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि कोकणात शुक्रवारी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली होती. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. उकाडाही वाढला होता. दुपारी तीनच्या सुमारास ढग दाटून आल्याने आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. काही वेळातच शहराच्या वेगवेगळ्या भागात वादळी वारे सुटले आणि हलक्या सरी पडायला लागल्या.

उपनगरांमध्ये जोर

शहराच्या सर्वच भागात पाच वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला. एरवीच्या तुलनेत अंधारही लवकर पडला. उपनगरांत प्रामुख्याने हडपसर, कात्रज, बिबवेवाडी, आंबेगाव पठार, येरवडा, औंध, पाषाण, बाणेर भागात पावसाचा जोर जास्त होता. ठिकठिकाणी रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत होते.

बाजारपेठांमध्ये धांदल

धनत्रयोदशीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. मध्यवर्ती भागासह रहिवासी क्षेत्रात काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. छत्र्या, रेनकोट घेऊन नागरिक फिरत होते. दिवाळी साहित्य विक्रेते, फटाक्यांचे स्टॉलधारकांची पावसामुळे धावपळ झाली. रात्री आठनंतर पावसाचा जोर ओसरला, मात्र उशिरापर्यंत हलक्या सरी पडत होत्या.

आकाश अंशत: ढगाळ राहणार

दिवाळीत आकाश निरभ्र शहरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पाऊस पडत असला, तरी रविवारपासून आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. शहरात शनिवारी आकाश मुख्यत: निरभ्र राहणार असून दुपारी आणि संध्याकाळी अंशत: ढगाळ असेल. रविवारपासून किमान तापमानात थोडी घट होणार असून, सकाळी धुके पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

हडपसर ७०.५

पाषाण ४५

कोरेगाव पार्क ४४

वडगाव शेरी ३८.५

तळेगाव ३६

चिंचवड ३२

शिवाजीनगर २७.५

खडकवासला २८.४

कोथरूड १४.६

खडकी २८

(स्रोत – भारतीय हवामानशास्त्र विभाग, आशय मेजरमेंट्स)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *