पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराशी सामना करणाऱ्या पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या तब्येतीची विचारपूस ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. आज पुणे दौऱ्यात शरद पवार आणि गिरीश बापट यांची भेट झाली. यावेळी बापट यांचे जवळचे मित्र राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे देखील उपस्थित होते. शरद पवार यांनी बापटांशी हस्तांदोलन करुन त्यांच्या तब्येतीची आपुलकीने विचारपूस केली.

पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त आयोजित विश्वस्त परिषदेला आज पुण्यात खासदार गिरीश बापट आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार दोघेही उपस्थित होते. या कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे आणि खासदार गिरीश बापट आधीच उपस्थित होते. बापटांना पाहताच शरद पवार यांनी गिरीशजी तब्येत काय म्हणतेय, बरी आहे का सध्या? अशी आपुलकीने विचारपूस केली.

गिरीश बापट पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या दोन आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील बापटांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. गिरीश बापट यांचे सर्वपक्षीय संबंध आहेत. शरद पवार यांच्या कामाविषयी बापट संधी मिळेल तेव्हा कौतुक करत असतात. बापट हे भाजपच्या जुन्या फळीतील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. पुण्यात भाजप वाढवण्यात गिरीश बापट यांचे महत्त्वाचे योगदान आहे. गिरीश बापट यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी उत्तम संबंध आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात पवारांचे वर्चस्व असताना बापट यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले. याला पवार आणि बापट यांच्यात असलेले सुमधुर संबंध कारणीभूत असल्याची चर्चा अनेकदा पुण्याच्या राजकीय वर्तुळात होतच असते.

मला कळतंच नाही बापट कुठेही उभे राहतात अन् निवडूनही येतात- पवार

पुण्यात अनेकवेळा आम्ही अनेक जागा जिंकल्या. पण मला अजून लक्षात आलं नाही की गिरीश बापट कुठेही उभे राहतात अन निवडून कसे येतात, असं शरद पवार चार महिन्यापूर्वी पुण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात (अंकुश काकडे लिखित हॅशटॅग पुणे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात) म्हणाले होते. एकदा गिरीष बापट कसब्यातून उभे राहिले, आम्ही ठरवलं त्यांच्यावर लक्ष ठेवायचं, पण ते काय आम्हाला शक्य झालं नाही, अशी आठवणही पवारांनी सांगितली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.