अब्दुल गनी अब्दुल सत्तार (४५) असे आरोपीचे नाव असून तो अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील रहिवासी आहे. मोहम्मद एजाज असे मृत व्यक्तीचे नाव होते. सत्तार आणि त्याचा सहकारी तसेच या प्रकरणातील सहआरोपी मोहम्मद अरमान अब्दुल रेहमान (२२) यांचा मृत एजाजशी वैयक्तिक वाद होता.
एजाज ४ मार्च २०२० रोजी चांदूरबाजार येथील लांजेवार हॉटेलमध्ये बसला असताना आरोपी तेथे आले. रेहमानने एजाजला पकडून त्याला चाकूने भोसकले. याचवेळी सत्तारने गोळ्या झाडल्याचाही आरोप होता. या प्रकरणी सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
मृत्यू गोळ्यांमुळे नाही
सत्तारने एजाजवर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या, पण त्या गोळ्या एजाजला लागल्या नाही. एजाजचा मृत्यू हा गोळ्या लागून नाही तर चाकुच्या जखमांमुळे झाल्याचे सत्र न्यायालयात सिद्धही झाले. सत्र न्यायालयानेसुद्धा बंदुकीच्या वापरावर शंका निर्माण केली होती. मात्र, भादंविच्या कलम ३४ नुसार अर्थात या खुनाच्या ठिकाणी खुनाच्याच उद्देशाने उपस्थित असल्याच्या आरोपाखाली सत्र न्यायालयाने सत्तारला दोषी ठरवित त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असावी, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. त्यामुळे खून तर झाला, मात्र तो गोळ्यांमुळे नाही तर चाकुच्या वारांमुळे झाला, असे निरीक्षण नोंदवित न्यायमूर्तिद्वय विनय जोशी आणि एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या खंडपीठाने सत्तारला सुनावण्यात आलेली शिक्षा निलंबित करीत त्याला २५ हजार रुपयांच्या जातमुचल्यावर जामीन मान्य केला. सत्तारतर्फे ॲड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.
Read Latest Maharashtra News And Marathi News