मुंबई- आपल्या अभिनयाने आणि हास्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी नेहमीच आपल्या विनोदांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यांच्या नुसत्या बोलण्याने चाहते पोट धरून हसायचे. आपल्या विनोद्बुध्दीने कित्येक चित्रपट त्यांनी अजरामर केले. विनोदी भूमिकांप्रमाणेच गंभीर भूमिकाही त्यांना उत्तम जमल्या. त्यांच्या गंभीर भूमिकांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. आपल्या गोड हास्याने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे लक्ष्मीकांत वैयक्तिक आयुष्यातही तितकेच दिलखुलास आणि हसरे होते. त्यांनी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत लव्ह मॅरेज केलं होतं. परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का लक्ष्मीकांत यांनी प्रिया यांना दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं होतं?

लक्ष्मीकांत यांनी प्रिया यांच्यासोबत दिलेल्या एक मुलाखतीत या गोष्टीबद्दल सांगितलं होतं. प्रिया आणि लक्ष्मीकांत यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात ते आणखी एका सेलेब्रिटी कपल सोबत बसले आहेत. तर अभिनेत्री रेशम टिपणीस त्यांना प्रश्न विचारताना दिसतेय. हा कार्यक्रम आहे ‘जोडी नं वन’. या कार्यक्रमात रेशम लक्ष्मीकांत यांना पहिला प्रश्न विचारते, ‘तुमच्यातला असा एक गुण जो प्रिया यांना आवडतो.’ त्यावर त्यांना उत्तर येत नाही. तर रेशम म्हणते तुम्ही इतरांना हसवता हाच तुमच्यातला गुण त्यांना आवडतो. त्यानंतर ती विचारते ‘प्रियाला दिलेली पहिली भेट कोणती?’ त्यावर खूप विचार करून लक्ष्मीकांत म्हणतात, ‘बऱ्याच दिल्यात. मला नीट आठवत नाहीये पण मी तिला पहिली भेट दिलेली ती एक साडी होती.’ त्यावर प्रियादेखील होकारार्थी मान हलवतात.


त्यानंतर रेशम प्रिया यांना लक्ष्मीकांत यांच्याबद्दल काही प्रश्न विचारते, त्यांचं आवडतं पुस्तक, त्यावर प्रिया ‘व्यक्ती आणि वल्ली’ असं योग्य उत्तर देतात. त्यांच्याबद्दल विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांची त्या योग्य उत्तर देतात. एकूणच तो राउंड प्रिया जिंकतात. त्यांच्या या व्हिडीओने अनेकांच्या मनातील लक्ष्मीकांत यांच्याबद्दलच्या आठवणी जाग्या केल्या. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत, असा कलाकार पुन्हा होणे नाही असं लिहिलं आहे.
‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचा मोठा अपघात; बाइकस्वाराची धडक, थोडक्यात बचावला जीव

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *