आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत अटीतटीची लढत होणार असे दिसत आहे. काँग्रेसकडून या निवडणुकीत कर्जमाफी, अर्धे वीजबिल, शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, महिलांसाठी नारी सन्मान योजना, कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना आणि ५०० रुपयांत गॅस सिलेंडर अशा अशी आश्वासने आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भाजपनेही महिलांसाठी लाडली बहन योजना, विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका योजना अंमलात आणल्या आहेत. तसेच त्याच शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या. त्यामुळे आपणच सत्तेत राहू अशी भाजपला आशा आहे.
व्होट बँक फुटण्याची भीती
भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना आपणच सत्तेत येऊ असा ठाम विश्वास आहे. मात्र, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या सक्रियते मुळे भाजप आणि काँग्रेसच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कारण, बसपा आणि सपा चंबळ- ग्वाल्हेर, विंध्य आणि बुंदेलखंडात मोठी व्होट बँक फोडण्याच्या तयारीत आहेत. बसपा आणि सपा यात यशस्वी झाल्यास काँग्रेस आणि भाजपचे नुकसान निश्चित आहे. या शिवाय केजरीवालांची आम आदमी पार्टीही मोठ्या प्रमाणात जोर लावत आहे त्यामुळे निवडणूक निकालांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस- भाजपचा सर्व्हे
काँग्रेस आणि भाजपने पक्षीय स्तरावर निवडणुकीचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमधून कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळेच दोन्ही पक्षांना पराभवाची भीती वाटू लागली आहे. या कारणामुळेच काँग्रेस आणि भाजपने या निवडणुकीत पुर्ण जोर लावल्याचे पाहायला मिळतेय. या सोबतच मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे डावपेच लढवले जात आहेत