अहमदाबाद: भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक संघाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला भिडणार आहे. यंदाच्या स्पर्धेतील भारताची वाटचाल स्वप्नवत राहिली आहे. फलंदाजांची दमदार कामगिरी, वेगवान गोलंदाजांचा भेदक मारा, त्यांना फिरकीपटूंची साथ यांच्या जोरावर भारतानं सलग १० सामने जिंकले आहेत. यंदाच्या स्पर्धेत टीम इंडिया अजिंक्य आहे. तर दुसऱ्या बाजूला स्पर्धेतील पहिले दोन सामने गमावलेल्या कांगारुंनी त्यानंतर सलग ८ सामने जिंकले आणि अंतिम फेरी गाठली.भारतीय कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार यांनी आज विश्वचषकाच्या करंडकासोबत फोटो सेशन केलं. गांधीनगरच्या जवळ असलेल्या अदालज विहीर परिसरात फोटो सेशन संपन्न झालं. ही विहीर स्थापत्यशास्त्राचा एक सुंदर आणि देखणा नमुना आहे. १४९९ मध्ये या विहिरीचं काम सुरू झालं. १६ व्या शतकात बांधकाम पूर्ण झालं. ही विहीर पाच मजल्यांची आहे. रोहित शर्मा फोटो सेशनवेळी करंडकाच्या उजव्या बाजूस उभा होता. तर कमिंग्स डावीकडे उभा होता. विहिरीच्या पायऱ्यांवर बसून काढण्यात आलेल्या फोटोतही रोहित करंडकाच्या उजव्या बाजूला होता. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी दोन्ही कर्णधार करंडकासोबत फोटोशूट करतात. तशी परंपरा आहे. याच परंपरेचा भाग म्हणून रोहित आणि कमिंग्सनं फोटोशूट केलं.फोटोशूट अन् योगायोग२०११, २०१५ आणि २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधीही फोटोशूट झालं होतं. विशेष म्हणजे या तिन्हीवेळा करंडकाच्या उजव्या बाजूस उभ्या असलेल्या कर्णधारांनीच अंतिम सामना जिंकला. २०११ मध्ये महेंद्रसिंह धोनी आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा करंडकाच्या अनुक्रमे उजव्या आणि डाव्या बाजूस उभे होते. तेव्हाचा अंतिम सामना धोनीच्या नेतृत्त्वात भारतानं जिंकला होता. विशेष म्हणजे तेव्हाची स्पर्धा भारतातच झाली होती. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियानं विश्वचषक स्पर्धा जिंकली. तर २०१९ मध्ये इंग्लंडनं बाजी मारली. या दोन्ही वेळा फोटो सेशनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे कर्णधार करंडकाच्या उजव्या बाजूस उभे होते. विशेष म्हणजे जिंकणारे दोन्ही संघ मायदेशात खेळत होते. गेल्या तीन स्पर्धांकडे पाहिल्यास दोन योगायोग स्पष्ट दिसतात. ज्या संघाचा कर्णधार करंडकाच्या उजव्या बाजूस उभा राहिला, तेच संघ अंतिम फेरीत जिंकले आणि दुसरा योगायोग म्हणजे तिन्ही स्पर्धा यजमान देशानंच जिंकल्या.