अन्नाच्या शोधात असताना हरिण पडले विहिरीत:वरखेडीच्या नागरिकांनी वाचवले विहिरीत पडलेल्या हरणाचे प्राण
अन्नपाण्याच्या शोधात असलेले एक हरीण विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. वरखेडी येथील शेतकरी बाबूराव फुके यांनी पुढाकार घेत नागरिकांच्या मदतीने हरणाचे प्राण वाचवले. ग्रामस्थांनी मोठ्या परिश्रमानंतर विहिरीतून बाहेर काढत हरणाला जीवनदान दिले. सिल्लोड तालुक्यातील वरखेडी येथील शेतशिवारातील गट नंबर ६० मधील बापूराव फुके यांच्या शेतातील विहिरीत शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अन्नपाण्याच्या शोधात भटकत असलेले एक हरीण विहिरीत पडले. याची माहिती शेतकरी बापूराव फुके यांच्या लक्षात आली. त्यांनी गावातील नागरिकांना व सिल्लोड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी साईनाथ पावर यांना फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर गावातील नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. त्यानंतर थोड्याच वेळात सिल्लोड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी साईनाथ पवार हेही घटनास्थळी दाखल झाले. या वेळी पडलेल्या हरणाला विहिरीबाहेर काढण्यासाठी विहिरीत दोघे उतरले. त्यांनी त्या हरणाला दोरीने बांधून विहिरीवर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या आणि वनपरिक्षेत्र अधिकारी साईनाथ पवार यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. त्या हरणाला पुन्हा जंगलात सोडण्यात आले. या वेळी सिल्लोड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी साईनाथ पवार,अंकुश फुके, योगेश भागवत, गोविंद भागवत यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.