वैष्णोदेवी मार्गावर भाविक विसावा घेत असताना भूस्खलन:दोघींचा मृत्यू, पावसामुळे भूस्खलन, हिमकोटी ट्रॅकवरील प्रवास थांबवला

जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिराच्या मार्गावर दरड कोसळल्याने सोमवारी मोठी दुर्घटना घडली. यात दोन महिलांचा मृत्यू झाला, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. घटनेवेळी भाविक पत्र्याच्या शेडखाली बसून विश्रांती घेत होते, त्याच वेळी त्रिकुटा डोंगराचा एक भाग पत्र्याच्या शेडवर पडला. रियासीचे उपायुक्त विशेष महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार यात्रेसाठी दोनपदरी मार्ग निर्माण करण्यात आले आहेत. यातील पहिला मार्ग म्हणजे, सांझी छत मार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे हिमकोटी मार्ग. हिमकोटी ट्रॅकवरील पंछी हेलिपॅडजवळ दुपारी २.१५ वाजता हा अपघात झाला. श्राइन बोर्डाचे मदत पथक जवळच होते, त्यांनी जखमींना बाहेर काढून बोर्डाच्या रुग्णालयात नेले. येथे दोन महिलांचा मृत्यू झाला. तर ५ वर्षांची मुलगी जखमी झाली आहे. पंजाबमधील गुरुदासपूर येथील सपना आणि उत्तर प्रदेशातील कानपूर येथील नेहा अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनंतर हिमकोटी ट्रॅकवरून प्रवास थांबवण्यात आला. महाजन यांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे वारंवार भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. १ जानेवारी २०२२ रोजी वैष्णो देवी मार्गावर झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला होता. देशात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागली असल्याने त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पुरामुळे अनेक मार्गावरील रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही उशिरा धावत आहेत. आंध्र प्रदेश : ६ जिल्ह्यांमध्ये पूर, आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू, ४.५ लाख लोक अडकले विजयवाडा |आंध्र प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खळबळ उडाली आहे. एनटीआर, गुंटूर, कृष्णा, एलुरु, पल्लंडू, बापटला आणि प्रकाशम जिल्ह्यात कृष्णा नदीला पूर आला आहे. त्यामुळे साडेचार लाख लोक अडचणीत सापडले आहेत. पावसामुळे आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या सात जिल्ह्यांमधील पूर परिस्थिती पाहता एनडीआरएफच्या १९ आणि एसडीआरएफच्या २० पथकांनी तब्बल ३१ हजार लोकांना १६६ मदत शिबिरांमध्ये सुरक्षितपणे हलवले आहे. नौदलाने आपले ७ हेलिकॉप्टर मदत आणि बचावकार्यासाठी तैनात केले आहेत. रेल्वेने १४० गाड्या रद्द केल्या आहेत, तर ९७ गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. २० जिल्ह्यांमध्ये १.५० लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. तेलंगण : ६ जिल्ह्यांमध्ये शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू, ५,००० कोटींचे नुकसान झाल्याचा सीएमचा दावा तेलंगणातील ६ जिल्ह्यांतील ९१ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. खम्मम, भद्राद्री, कोठागुडम, हैदराबाद आणि सूर्यपेट या जिल्ह्य़ांमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तर आयटी कंपन्यांना घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्राकडे तातडीने २ हजार कोटींची मदत मागितली. पावसाने ५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment