दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात वळणावर शिवशाही उलटली:11 ठार, पळसगाव-डव्वा-खजरी मार्गावरील अपघातात 25 जखमी

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात आज दुपारी १२.५० वाजता भरधाव शिवशाही बस दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात वळणावर उलटली. या भीषण अपघातात ११ प्रवासी ठार झाले असून २५ जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. ११ मृतांपैकी ९ जणांची ओळख पटली असून अन्य दोन जणांची ओळख अद्याप पटली नाही. शुक्रवारी भंडारा आगाराची एमएच ०९ एम १२७३ क्रमांकाची भंडारा-गोंदिया ही शिवशाही बस गोंदियाकडे येत होती. गोंदिया-कोहमारा मार्गावरील डव्वा गावाजवळ वळणावर समोरील दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. १०० किमी प्रतितास वेगाने धावणारी ही बस उलटल्यानंतर २० फूट अंतरापर्यंत घासत गेली. त्यामुळे बसमधील ८ प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. डव्वा येथील गावकऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले व रुग्णवाहिका बोलावून त्यांना गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या अपघातात बसचालक व वाहकासह ४० प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांच्या नातेवाइकांना केंद्राकडून दोन लाख, तर राज्य शासनाकडून १० लाख शिवशाहीच्या अपघातातील प्रत्येक मृतांच्या नातेवाइकांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत केंद्र सरकारने जाहीर केली आहे. पीएमएनआरएफमधून ही आर्थिक मदत देण्यात येणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातातील मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले आहेत. तसेच जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पतीच्या निधनानंतर पोलिस स्मिताचा अपघातात मृत्यू अपघातात मृत्यू झालेल्या स्मिता सूर्यवंशी (३२, रा. अर्जुनी मोरगाव) यांचे पती पोलिस विभागात होते. त्यांचे सहा महिन्यांपूर्वी आजाराने निधन झाले. दरम्यान, सासू-सासरे व एका छोट्याशा बाळासह त्या हलाखीचेे जीवन जगत होत्या. दरम्यान, स्मिता यांना पोलिस मुख्यालय गोंदिया येथे शिपाई म्हणून तीन महिन्यांपूर्वी नोकरी मिळाली. परिवाराला भेटून स्मिता अर्जुनी येथून साकोलीला व तेथून गोंदियाला जात होत्या. तातडीने रुग्णवाहिका मागवल्या गोंदिया येथील जाबीर यांनी सांगितले की, दुपारी १२.४४ वाजता दुचाकीने येत असताना बस उलटलेली दिसली. तेथे किंचाळण्याचा आवाज येत होता. धाडस दाखवत बसच्या खिडकीच्या काचा फोडल्या आणि १५-१६ महिला-पुरुषांना बाहेर काढले. फोन करत रुग्णवाहिका मागवल्या. यांचा झाला अपघातात मृत्यू स्मिता विक्की सूर्यवंशी, ३२, रा. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया मंगला राजेश लांजेवार, रा. पिंपरी, जि.भंडारा राजेश देवराम लांजेवार, रा. पिंपरी, जि. भंडारा कल्पना रविशंकर वानखेडे, ६५, रा. वरोरा, जि.चंद्रपूर रामचंद्र कनौजे, ६५, रा. चांदोरी, ता. साकोली, जि. भंडारा अंजिरा रामचंद्र कनौजे, ६०, रा. चांदोरी, जि. भंडारा आरिफा अजहर सय्यद, ४२, रा. घोटी, गोरेगाव, जि. गोंदिया नयना विशाल मिटकर, ३५, रा. बेसा नागपूर दोन अनोळखी प्रवासी. वाहतूक काही काळ ठप्प शिवशाही उलटून झालेल्या अपघाताची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिस स्टेशनचा ताफा घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्याला सुरुवात केली. दरम्यान, या भीषण अपघातामुळे गोंदिया-कोहमारा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment