मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करत ऑस्ट्रेलियानं विजेतेपद पटकावलं. सलग १० सामने जिंकून अंतिम फेरी गाठणाऱ्या टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण उपांत्य फेरीपर्यंत उत्तम खेळणारा भारतीय संघ अंतिम सामन्यात ढेपाळला. त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. या पराभवामुळे आयसीसी स्पर्धांमधील भारताचा विजेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला.भारताचा पराभव पचवण्याचा, कटू आठवणी विसरण्याचा प्रयत्न क्रिकेट चाहते करत आहेत. १० सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करणारा भारतीय संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभूत कसा झाला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या पराभवाच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी हरयाणाच्या गुरुग्राममधील एका कंपनीनं महत्त्वाचा निर्णय घेतला. कंपनीनं सर्व कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी दिली. पराभवाच्या दु:खद आठवणींमधून बाहेर पडण्यासाठी कंपनीनं कर्मचाऱ्यांना हा अवधी दिला आहे. मार्केटिंग मूव्स एजन्सीत काम करणाऱ्या दीक्षा गुप्ता यांनी भारताच्या पराभवानंतर लिंक्डइनवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ‘विश्वचषकातील प्रत्येक अपडेट्सकडे लक्ष ठेवून असल्यानं, भारतीय संघाच्या कामगिरीकडे डोळे लावून बसलेले असल्यानं अंतिम सामन्यातील पराभव पचवणं जड जात आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास बॉसचा मेसेज आला. पराभवाच्या दु:खातून सावरण्यासाठी सगळ्यांना एक दिवसाची सुट्टी देण्यात आली असल्याचा उल्लेख त्यात होता. मेसेज पाहून आम्हाला धक्काच बसला. आमच्यातील अनेकांचा विश्वास बसत नव्हता,’ असं दीक्षानं पोस्टमध्ये नमूद केलं आहे. यासोबतच तिनं बॉसच्या मेसेजचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.