छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना कोणतीही गॅरंटी नाही, तरुणांना रोजगाराची गॅरंटी नाही पण भ्रष्टाचाऱ्यांना भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या हीच मोदी गॅरंटी आहे, अशी कडाडून टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, ते भाजपमध्ये गेले. अशोक चव्हाण देखील आदर्श घोटाळा लपविण्यासाठी भाजपमध्ये गेले, असा आरोप करीत काँग्रेसमुक्त भारत घोषणा देणारे आता काँग्रेसव्याप्त भाजप झालेले आहेत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

उद्धव ठाकरे आज मराठवाडा दौऱ्यावर आहेत. गंगापूरमध्ये जनसंवाद मेळाव्यात उपस्थितांशी ते संवाद साधत आहेत. या मेळाव्यात बोलताना त्यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर टोलेबाजी करताना भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावरही जोरदार टीका केली.

भाजप भाडोत्री-बाजारबुणगे माणसं घेतंय आणि भाजपच्या निष्ठावंतांना सतरंज्या उचलायला लावतंय. प्रत्येकजण आपापलं बघतोय, पण माझ्या शेतकऱ्याकडे कोण बघणार? शेतकऱ्यांची, रोजीरोटीची गॅरंटी नाही. तुम्ही भ्रष्टाचार करून भाजपमध्ये या. तुम्हांला आमदार, खासदार, मंत्री करू ही ‘मोदी गॅरंटी’ आहे. शिवसेना मिंध्यांच्या ताब्यात दिली, पवारसाहेबांची राष्ट्रवादी अजित पवारांची ताब्यात दिली, आता काँग्रेस अशोकरावांच्या ताब्यात देणार काय? असा सवालही ठाकरे यांनी विचारला.

देशवासीयांसाठी असलेल्या योजना ‘भारत सरकार’च्या आहेत की ‘मोदी सरकार’च्या आहेत? मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर केली आणि ती अमलात आणली. त्यासाठी तुमच्यासारखी निवडणुकीची वाट पाहिली नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रात हा उद्धव ठाकरे जर शेतकऱ्यानांची कर्ज माफी करू शकतो, तर विश्वगुरू नरेंद्र मोदी का नाही करू शकत? असा सवाल त्यांनी केला.

काँग्रेस सोडण्याचं कारण? कोणकोण आमदार संपर्कात, राज्यसभेवर जाणार का? अशोक चव्हाण यांनी सगळं सांगितलं

८० कोटी लोकांना जर तुम्हाला फुकट धान्य द्यावं लागत असेल, तर देशाची लोकसंख्या लक्षात घेता तुम्ही गरिबी कोणाची हटवली? असा सवाल करताना अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, ते भाजपमध्ये गेले. अशोक चव्हाण देखील आदर्श घोटाळा लपविण्यासाठी भाजपमध्ये गेले. कालपर्यंत जागा वाटपाची चर्चा करणारे अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले. आत्मविश्वास नसल्याने भाजप फोडाफोडी करतंय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचवेळी उद्या काँग्रेसमधून आलेला माणूस भाजपाध्यक्ष असेल, असं झालं तर आश्चर्य वाटून घेऊ नका, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *