एकनाथ शिंदेंच्या बंडामुळेच भाजप सत्तेत:लाडक्या भावाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, बच्चू कडू यांची CM पदासाठी शिंदे यांना पसंती
भाजप सत्तेत आला ते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे. भाजप सत्तेत आलीच नसती तर आज जे चित्र दिसत आहे, तसे चित्र दिसले नसते. शिंदेंनी बंड केले नसते तर लाडकी बहिणी योजना देखील आली नसती. त्यामुळे ज्या लाडक्या भावाने लाडकी बहीण योजना शोधून काढली. त्या लाडक्या भावाकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येणार नसल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी म्हटले आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांचा दावा प्रबळ करण्याचा प्रयत्न कडू यांनी केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे यांना साथ देण्यासाठी गुवाहाटीला पोहोचलेले आमदार बच्चू कडू यांचा आता विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. मात्र तरी देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडलेली नाही. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशामध्ये एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. जातीचा नव्हे तर धर्माचा फॅक्टर या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. धर्माचा झेंडा जिंकला असून आमच्या सेवेचा झेंडा या निवडणुकीत हरला असल्याचे देखील ते म्हणाले. झेंडे जिंकले, सेवा हरली…. कुठल्याही निवडणुकीत पारदर्शकता असली पाहिजे. मात्र ईव्हीएम मध्ये पारदर्शकता नाही असा आरोप देखील त्यांनी केला. जगातील सर्व देश बॅलेट पेपरवर निवडणुका घेत असतील तर भाजप बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊ असे का म्हणत नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. राज्यामध्ये महायुतीला बहुमत मिळाले असले तरी देखील महायुतीचा मुख्यमंत्री कोण? याबाबत अद्याप नाव समोर आलले नाही. विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना भारतीय जनता पक्षाच्या वतीने देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असर दावा केला जात आहे. त्यामुळे याबाबत राज्यात राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यातच आता बच्चू कडू यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या नावाला पसंती दिली आहे.