[ad_1]

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: भाजपकडून भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध असल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. मात्र सर्वेक्षणाचा निकाल काहीही असो, मी गेल्या अनेक वर्षांपासून यवतमाळ वाशिममधून निवडून येत आहे. या मतदारसंघात माझी मोठी ताकद आहे. त्यामुळे मी पुन्हा यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकते. मी मतदारसंघावरील दावेदारी अद्याप सोडलेली नाही, असे भावना गवळी यांनी ठणकावून सांगितले.

‘मी आता माझ्या मतदारसंघामध्ये परत जात आहे. मी यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे,’ असेही गवळी यांनी सांगितले. त्यामुळे आता भावना गवळी या महायुतीच्या अधिकृत उमदेवार राजश्री पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करून अर्ज भरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत तीन खासदारांचा पत्ता कट

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधातील बंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या मावळत्या लोकसभेच्या १३ खासदारांपैकी आत्तापर्यंत तीन जणांना उमेदवारी मिळालेली नाही. उमेदवारी नाकारण्यात आलेल्या खासदारांमध्ये कृपाल तुमाने, हेमंत पाटील आणि भावना गवळी यांचा समावेश आहे. अशातच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी अधांतरी आहे. त्यामुळे शिवसेनेत भाजपच्या दाबवतंत्राविरोधात नाराजी आहे. लोकसभेचे उमेदवार निश्चित करताना भाजपचा दबाव सहन करावा लागत असेल तर विधानसभा निवडणुकीत काय होणार, याची चिंता शिवसेनेच्या आमदारांना लागली आहे.
कुणी कितीही करुद्या कल्ला, पाठीशी अख्खा जिल्हा, भावना गवळींच्या समर्थनात वाशीममध्ये पोस्टर

‘भाजपने एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये’

भाजपने एकनाथ शिंदे यांचा बळी घेऊ नये, असा टोला प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी लगावला. भावना गवळी यांना उमेदवारी कशी मिळेल, हे शिंदे यांनी पाहायला हवे, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी लगेचच प्रत्युत्तर दिले. बच्चू कडू यांनी स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही शेलार यांनी दिला आहे. दुसरीकडे दबावाच्या चर्चा दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.

भावना गवळींना उमेदवारी जाहीर करा नाहीतर राजीनामे देणार; शिवसैनिकांचा निर्धार

‘भाजपच्या दबावामुळे उमेदवार बदलले’

मातोश्रीवर सन्मान मिळत होता. तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी, अशी पोस्ट विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर केली आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *