मुंबई : आयुष्यात घडलेल्या एखाद्या अपराधामुळे तुरुंगातील जीवन जगावे लागत असलेल्या महिला कैद्यांनी रद्दी पेपरमधून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. प्रयास संस्थेच्या मदतीने या महिलांनी सुमारे पाच हजार कागदी पिशव्या तयार केल्या आहेत. आता या पिशव्यांच्या विक्रीसाठी महिलांनी बाजारपेठेचा शोध सुरू केला आहे.

तुरुंगात शिक्षा भोगत असताना वैयक्तिक गरजांसाठी आणि तुरुंगातून बाहेर पडल्यावर खिशात दोन पैसे शिल्लक राहावेत या उद्देशाने प्रयास संस्थेकडून या महिला कैद्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून या महिलांना कापडी आणि कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण संस्थेने दिले आहे. हे प्रशिक्षण घेऊन ठाणे कारागृहात बंदिवासात असलेल्या ३५ महिलांनी सुमारे तीन हजार कापडी पिशव्यांची पहिली खेप विक्रीसाठी तयार केली आहे. त्याचबरोबर शिक्षा भोगून तुरुंगातून सुटलेल्या चार महिलांनी मिळून आणखी ५०० पिशव्या तयार केल्या आहेत. संस्थेने सामाजिक संस्थांमध्ये आश्रयाला असलेल्या तसेच देहविक्री व्यवसायातून सुटून पुनर्वसनाच्या प्रक्रियेत असलेल्या महिलांच्या मदतीने आणखी दीड हजार कागदी पिशव्या तयार केल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या कागदी पिशव्यांचा प्रसार करून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयास संस्थेकडून आता प्रयत्न केले जात आहेत.

संस्थेच्या या प्रयत्नाला आता विक्रेत्यांची साथ हवी आहे. त्यासाठी विक्रेत्यांनी या महिलांनी तयार केलेल्या पिशव्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आवाहन टाटा समाज विज्ञान संस्थेच्या प्रयास प्रकल्पाचे संचालक प्रा. विजय राघवन यांनी केले आहे.

तुरुंगातील महिला कुर्ता शिवणार

प्रयास संस्थेकडून तुरुंगातील बंदिवान महिलांना आणि तुरुंगातून सुटलेल्या आणि पुनर्वसनाच्या प्रक्रियेत असलेल्या महिलांना रोजगाराचे विविध प्रशिक्षण दिले जात आहे. भविष्यात संस्थेच्या माध्यमातून या महिलांना कुर्ता शिवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कुर्त्यांची विक्री करून महिलांना आणखी उत्पन्न मिळावे, असा प्रयत्न असल्याचे टाटा समाज विज्ञान संस्थेच्या प्रयास प्रकल्पाचे सामाजिक कार्यकर्ता विकास कदम यांनी सांगितले.

रद्दीद्वारे द्या मदतीचा हात

तुरुंगातील बंदिवान महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या या उपक्रमात नागरिकांनाही त्यांचा सहभाग नोंदविता येणार आहे. तुमच्याकडील वृत्तपत्रांची रद्दी ठाण्यातील झप्पी स्टोअरच्या घंटाळी आणि हिरानंदानी मेडोस येथील दुकानांमध्ये जमा करून ती या महिलांना कागदी पिशव्या निर्मितीसाठी देता येणार आहे. यातून महिलांचा पिशव्या निर्मितीचा खर्च घटणार आहे. तसेच २६ जानेवारीनिमित्त संस्थेकडून रहिवासी सोसायट्यांमधूनही रद्दी गोळा केली जाणार आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *