प्राजक्ता माळीच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल:मुंबई पोलिस आयुक्तांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे दिले आदेश
अभिनेत्री प्राजक्ता माळीने भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिस आयुक्त यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख करत एक वक्तव्य केले होते. प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेत धस यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. सुरेश धस यांनी माफी मागावी, अशी मागणी तिने केली होती. त्यानंतर प्राजक्ताने सुरेश धस यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. राज्य महिला आयोग काय म्हणाले?
आता राज्य महिला आयोगाच्या एक्स अकाऊंटवर या प्रकरणाच्या कारवाईबाबत माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. बीड जिल्ह्यातील आमदार श्री सुरेश धस यांनी श्रीमती माळी यांच्याबद्दल केलेले कथित अयोग्य, अवमानकारक व बदनामीकारक विधान तसेच त्यांनंतर सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असलेल्या बदनामीकारक बातम्या यामुळे त्यांच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनावर त्याचे परिणाम होत असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून महिलेच्या प्रतिष्ठेस बाधा पोहोचवणारे असल्याने राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिस आयुक्त यांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले असून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना केली असल्याचे राज्य महिला आयोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात आमदार सुरेश धस यांच्याविरोधात कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. प्राजक्ता माळीने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
दरम्यान, प्राजक्ता माळीने सुरेश धस यांच्या वक्तव्याच्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी सागर बंगल्यावर सहकुटुंब भेट घेतली. मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी, महिलांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्राजक्ता माळी आणि तिच्या कुटुंबाला दिले होते.