म. टा. प्रतिनिधी, नाशिक : भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना होत असून, या ‘हाय व्होल्टेज’ सामन्याची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे. या सामन्याचा थरार ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी नाशिककर विमानाने थेट अहमदाबाद गाठण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे विमानांचे तिकीट दर गगनाला भिडले असून, एरवी चार ते सात हजारांपर्यंत मिळणारे तिकीट शनिवारसाठी १५ हजारांवर जाऊन पोहोचले आहे.

भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे रविवारी (दि. १९) भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. नाशिकमध्ये अनेक क्रिकेटप्रेमी असेही आहेत, जे महत्त्वाच्या सामन्यांना प्रत्यक्ष हजेरी लावतात. अहमदाबादसाठी ओझर विमानतळावरून दोन फ्लाइट उपलब्ध आहेत. यंदाच्याच वर्ल्ड कपमध्ये भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत १४ ऑक्टोबर रोजी सामना झाला होता. तो पाहण्यासाठी नाशिकमधील काही बांधकाम व्यावसायिकांसह अन्य क्रिकेटप्रेमी विमानाने अहमदाबादला गेले होते. आता अंतिम सामन्यात भारताचा प्रवेश निश्चित होताच हा सामना थेट स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याचे क्रिकेटप्रेमींचे प्रयत्न सुरू झाले आहेत. नाशिकहून अहमदाबादला कमी वेळेत पोहोचण्यासाठी विमानसेवा हाच एकमेव पर्याय आहे. या सेवेच्या मागणीत अचानक प्रचंड वाढ झाली असून, त्यामुळे विमान कंपनीने तिकीटदरात जवळपास दुपटीने वाढ केली आहे.

क्रिकेटप्रेमींसाठी गुड न्यूज: वर्ल्ड कप फायनलसाठी ६ विशेष एक्स्प्रेस सुसाट जाणार, वेळापत्रक जाहीर
नाशिक येथून अहमदाबादसाठी सकाळी ११.०५ वाजता व रात्री ९.२५ वाजता अशा दोन फ्लाइट आहेत. सामना रविवारी दुपारी दोन वाजता आहे. तो गाठण्यासाठी आदल्या दिवशी म्हणजे शनिवारीच पोहोचण्याचा क्रिकेटप्रेमींचा प्रयत्न आहे. त्यामुळे शुक्रवार व शनिवारच्या विमानाची माहिती घेतली जात आहे. परिणामी, एरवी चार ते सात हजारांपर्यंत मिळणाऱ्या तिकिटाचा दर शनिवारसाठी मात्र १५ हजारांवर जाऊन पोहोचला आहे. शुक्रवार, शनिवार असे दोन्ही दिवस अहमदाबाद विमानसेवेचे दर सुमारे १५ हजारांपर्यंत असून, रविवारी सामन्याच्या दिवसासाठी मात्र हा दर शुक्रवारी दुपारी ७,७०० रुपये असा दाखवला जात होता.

अनेकांकडून आधीच बुकिंग

यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ ऐन भरात असून, भारतच अंतिम फेरी गाठणार, अशी अटकळे यापूर्वीच क्रिकेटप्रेमींनी बांधली होती. त्यामुळे अनेकांनी यापूर्वीच सामन्याची व विमानाची तिकिटे आधीच बुक करून ठेवली आहेत. काही जणांकडून मात्र भारत अंतिम फेरीत पोहोचल्यावर दोन्ही तिकिटे मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच येण्याची चिन्हे आहेत. कारण अंतिम सामन्याची जवळपास सर्व तिकिटे विकली गेली आहेत. आहे त्या तिकिटांचा काळाबाजार सुरू असून, त्याची किंमत तब्बल लाखापर्यंत गेल्याचे कळते.

पाच विमाने; पण…

नाशिक-अहमदाबाद विमानाची तिकिटेही जवळपास बुक झाली आहेत. हे विमान ७८ आसनी असून, शुक्रवारपासून अंतिम सामन्यापर्यंत पाच विमाने उपलब्ध आहेत. त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त ३९० लोक अहमदाबादला जाऊ शकतात. मात्र, त्यापैकी बहुतांश तिकिटे आधीच बुक झाली असल्याने ऐनवेळी किती जणांना संधी मिळेल, याचा अंदाज लावणे कठीण असल्याचे या क्षेत्रातील व्यावसायिकांनी सांगितले.
Gold Prices: दिवाळीनंतर सोन्याचे दर तेजीत, भाव ६१ हजारांपार; खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का?Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *