डीआरएस म्हणजे?
डीआरएस म्हणजे डिसिजिन रिव्ह्यू सिस्टिम. अपांयर डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम म्हणून तिला ओळखले जात होते. मैदानावरील पंचांनी एखाद्या फलंदाजाला बाद दिले किंवा नाही दिले, तर प्रतिस्पर्धी कर्णधार डीआरएस घेऊ शकतो. या पद्धतीनुसार तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मैदानावरील पंचांचा निर्णय चूक की बरोबर ते पडताळता येतो. निर्णय चुकला असेल, तर तिसरे पंच अचूक निर्णय देतात. १९९२ पासून ही पद्धत होती. २००८मध्ये कसोटी सर्वप्रथम तिचा वापर झाला, तर वन-डेत २०११मध्ये आणि टी-२०मध्ये २०१७मध्ये ही पद्धत अमलात आली.
लोकेश राहुल दुसरा
या वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम यष्टिरक्षकांच्या यादीत लोकेश राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने १० सामन्यांत १६ बळी मिळवले आहेत. यात १५ झेल असून, एक यष्टिचीत आहे. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डीकॉक २० बळींसह अव्वल आहे.
कर्णधाराचा विश्वास यष्टिरक्षकावर
प्रत्येक संघाला डावात दोन डीआरएस घेण्याची परवानगी असते. चुकीचा डीआरएस घेतला, तर ते दोन्ही डीआरएस वाया जाऊ शकतात. त्यामुळे मोक्याच्या क्षणी डीआरएस शिल्लक नसला, तर संघाला फटका बसू शकतो. त्यामुळे कर्णधार डीआरएस घेताना आधी यष्टिरक्षकाचे मत जाणून घेत असतो. त्याला डीआरएसचा अचूक अंदाज येत असतो.
लोकेशची अचूकता
या वर्ल्ड कपमध्ये राहुलने गोलंदाज आणि कर्णधाराला किमान पाच वेळा चुकीचा रिव्ह्यू घेण्यापासून रोखले आहे. उत्साहाच्या भरात गोलंदाज कर्णधाराला रिव्ह्यू घेण्याचा आग्रह करतो. कर्णधार लांब असेल, तर त्याला गोलंदाजावर विश्वास ठेवावा लागतो. मात्र, राहुलने योग्य निर्णय देऊन कर्णधाराला रोखले. यानंतर रिप्लेमध्ये राहुलचा निर्णय बरोबर असल्याचे दिसून आले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याने जेव्हा-जेव्हा कर्णधाराला रिव्ह्यू घ्यायला सांगितले आहेत, ते जवळपास बरोबर आले आहेत.
दृष्टिक्षेप…
– लोकेश राहुल भारताचा नियमित यष्टिरक्षक नाही.
– ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाल्याने त्याच्याकडे भारताचे यष्टिरक्षण आले.
– आतापर्यंत काही अप्रतिम झेल टिपून राहुलने आपले कौशल्य दाखवून दिले आहे.
– राहुलने या वर्ल्ड कपमध्ये दहा सामन्यांत ७७.२०च्या सरासरीने ३८६ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
क्षेत्ररक्षणादरम्यान कर्णधार हा साधारण मिड-ऑन किंवा मिड-ऑफला उभा असतो. डीआरएस घ्यायचा की नाही, यासाठी तो यष्टिरक्षक आणि गोलंदाजाला विचारतो. चेंडूचा टप्पा कुठे पडला, यासाठी तो आधी गोलंदाजाला विचारतो. यानंतर चेंडूची दिशा आणि उंची, यासाठी यष्टिरक्षकाचा कौल महत्त्वाचा ठरत असतो. – दीप दासगुप्ता, भारताचा माजी यष्टीरक्षक
Read Latest Sports News And Marathi News