न्यायालयात सादर केलेल्या पोलिस अहवालानुसार, एअर होस्टेसचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता. तिच्या बहीणीचा मित्र रविवारी रात्री १० च्या सुमारास फ्लॅटवर गेला. दरवाजाच्या बेलला प्रतिसाद न मिळाल्याने त्याने चावी बनवणाऱ्याला कॉल केला. डुप्लिकेट चावी वापरून त्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. बहिणीने तिच्या मित्राला त्याचा फोन व्हिडिओ कॉलवर ठेवण्यास आणि खोल्या तपासण्यास सांगितले. पीडित महिला लिव्हिंग रूममध्ये किंवा बेडरूममध्ये नव्हती, परंतु एसी युनिट सुरू होते. त्यानंतर मित्राने बाथरूममध्ये प्रवेश केला आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. बहिणीनेही व्हिडिओ कॉलवर हे दृश्य पाहिले. मित्राने तिला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा गळा चिरल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने आणि चावी बनवणाऱ्याने पोलिसांना माहिती दिली.
अटवालला अटक करण्यासाठी पोलिसांनी आठ पोलिस पथके तयार केली. सोमवारी कामावर जाणाऱ्या अटवालला पोलिसांनी अटक केली. त्यापूर्वी त्यांनी बिल्डिंग हाउसकीपिंग कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांसह ४० जणांची चौकशी केली होती. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “सोमवारी अटवालच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर जखमा दिसून आल्या”.
चौकशीदरम्यान, टॉयलेट फ्लश चोक-अप साफ करण्यासाठी पीडितेच्या फ्लॅटमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पीडितेला धमकावण्यासाठी आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यासाठी त्याने चाकू सोबत नेला होता. तिने प्रतिकार केला, तिने अटवालच्या डोक्यावर मारलं, त्याचा चेहरा आणि मानेवर ओरबाडलं आणि त्यात त्याच्या हातालाही दुखापत झाली. त्यानंतर त्याने तिच्यावर हल्ला केला आणि तिचा गळा चिरला. फ्लॅट सोडण्यापूर्वी त्याने गणवेश साफ केला आणि कपडेही बदलले.
पोलिसांनी ११ इंच लांब चाकू जप्त केल्याचं अहवालात म्हटलं आहे. आरोपीचे केस, नखे, रक्त आणि डीएनएचे नमुने जतन करण्यात आले आहेत. त्याचा फोनही जप्त करण्यात आला आहे, असेही त्यात म्हटले आहे.