नाशिक-संभाजीनगरात हुडहुडी, विदर्भात पाऊस:राज्यात जळगावपाठोपाठ नाशिक सर्वात थंड
बंगालच्या उपसागरातील ‘अकवान’ चक्रीवादळामुळे राज्यात सध्या हवामानाची दोन वेगळी रूपे पाहायला मिळत आहेत. एकीकडे हे वादळ सरकताच जळगाव, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह मध्य महाराष्ट्रात थंडीची जोरदार री-एन्ट्री झाली आहे, तर दुसरीकडे याच वादळाच्या प्रभावामुळे विदर्भातील यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. नाशिकचा पारा थेट १० अंश सेल्सियसवर पोहोचला असून जळगावपाठोपाठ (८.० अंश) राज्यात नाशिक दुसरे सर्वात थंड शहर ठरले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही किमान तापमान १३.८ अंशावर नोंदवले गेले आहे. ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवरील गोपाळपूरजवळ धडकल्यानंतर ‘अकवान’ चक्रीवादळ आता पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारताकडे (उत्तर-उत्तर-पूर्व दिशेने) सरकले आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर-मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यावर या वादळाचा कोणताही थेट परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ढगाळ वातावरण पूर्णपणे निवळल्याने उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या २० ते २६ नोव्हेंबर या सात दिवसांच्या अंदाजानुसार, नाशिक जिल्ह्यात पुढील सहा दिवस हवामान पूर्णपणे कोरडे आणि आकाश निरभ्र राहील. यामुळे दिवसा ऊन असले तरी सायंकाळनंतर गारठा वाढेल आणि रात्री व पहाटे हुडहुडी कायम राहील. गोंदिया, यवतमाळमध्ये पाऊस : दुसरीकडे, ‘अकवान’ चक्रीवादळाचा फटका विदर्भातील शेतकऱ्यांना बसला. गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाची आज सकाळपर्यंत ४.८ मिमी नोंद झाली आहे. या अवकाळी पावसामुळे उघड्यावरील धान भिजले. यवतमाळमध्येही वर्षातील नीचांकी ११.२ अंश तापमानानंतर आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी यवतमाळ शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस झाला.