रविकांत तुपकरांच्या आंदोलनाची दखल:आज मुख्यमंत्र्यांसोबत होणार निर्णायक चर्चा

रविकांत तुपकरांच्या आंदोलनाची दखल:आज मुख्यमंत्र्यांसोबत होणार निर्णायक चर्चा
सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, हमीभाव आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत झालेल्या आक्रमक आंदोलनानंतर अखेर राज्य सरकारने चर्चेची भूमिका घेतली आहे. विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न, सातबाऱ्यांच्या प्रती भिरकावणे, सोयाबीन-कापूस उधळणे, तसेच कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोरील झाडांवर चढून आंदोलन केल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत आज दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक निश्चित झाल्याची माहिती दिली. तुपकरांचे आंदोलकांना आवाहन सरकारकडून बैठकीचा निरोप मिळाल्यानंतर रविकांत तुपकर यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यातून मंत्रालयासमोरील झाडांवर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी फोनवरून संवाद साधला. "तुमचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, लढणारी माणसं टिकली पाहिजेत," असे आवाहन करत त्यांनी आंदोलनकर्त्यांना खाली उतरण्याची विनंती केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले. आता या बैठकीत कर्जमुक्ती, पीकविमा, शेतकरी सन्मान निधी आणि हमीभाव यांसारख्या प्रमुख मागण्यांवर सरकार कोणता निर्णय घेते, याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आंदोलनाचे अपडेट.. गळ्यात दोरी अडकवून झाडावर चढले शेतकरीपुत्र एककीकडे पोलिस तुपकरांना गाडीत टाकत असतानाच, दुसरीकडे आंदोलक अधिकच आक्रमक झाले. काही आंदोलक शेजारील एका मोठ्या झाडावर चढले. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे या आंदोलकांनी आपल्यासोबत दोऱ्या आणल्या होत्या. झाडाच्या फांदीला दोरी बांधून ती थेट स्वतःच्या गळ्यात अडकवून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. "सरकारने तात्काळ विनाअट कर्जमुक्तीची घोषणा करावी, अन्यथा आम्ही याच झाडावर गळफास घेऊन आमचे आयुष्य संपवू," असा आर्त टाहो आंदोलकांनी झाडावरून फोडला. पोलिस यंत्रणेची उडाली धांदल; व्हिडिओ व्हायरल
मंत्रालयासारख्या व्हीआयपी (VIP) परिसरात भरदिवसा गळ्यात फास लावून तरुण झाडावर चढल्याने मुंबई पोलिसांची आणि प्रशासनाची प्रचंड धांदल उडाली. आंदोलकांना खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांकडून मनधरणी सुरू करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा थरार कार आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. गळ्यात दोरी घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या शेतकरी पुत्रांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, शेतकऱ्यांच्या या उद्विग्नतेमुळे सरकारवर तीव्र टीका होत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारी विधानभवनासमोर अभूतपूर्व आक्रमक आंदोलन छेडले. सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतमालाला हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी तुपकर शेतकऱ्यांसह थेट विधानभवनाच्या दिशेने धडकले. विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न करीत सातबाऱ्यांच्या प्रती विधानभवनात फेकल्या, तसेच सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारचा निषेध करण्यात आल्याने विधानभवन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांच्या प्रती विधानभवनाच्या दिशेने फेकल्या विधानभवन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही तुपकर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. काही क्षणांतच त्यांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांच्या प्रती विधानभवनाच्या दिशेने फेकल्या. त्याचबरोबर सोयाबीन आणि कापूस उधळून "शेतकऱ्यांच्या घामाची किंमत द्या", "सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्या", "सरकारने दिलेला शब्द पाळा" अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामागे गेल्या महिन्यातील अन्नत्याग आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. १५ जून ते १९ जूनदरम्यान बुलढाण्यातील निवासस्थानासमोर रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमुक्तीसह विविध शेतकरी मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर बिघडल्याने राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेक ठिकाणी रास्तारोको, जाळपोळ, आत्मदहनाचे प्रयत्न आणि संतप्त आंदोलनांनी सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप करत शेतकरी प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय केला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनानंतर तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले. मात्र, त्यानंतर अनेक दिवस उलटूनही बैठक न झाल्याने आणि सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा तसेच इतर मागण्यांबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करत तुपकर यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. तुपकर शेतकऱ्यांसह अचानक विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दाखल झाले. प्रवेशद्वार ओलांडून विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्याआधीच सातबाऱ्यांच्या प्रती विधानभवनाच्या दिशेने फेकण्यात आल्या आणि सोयाबीन-कापूस उधळून सरकारविरोधातील संताप व्यक्त करण्यात आला. काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यानंतर बंदोबस्तासाठी तैनात शेकडो पोलिसांनी तुपकर आणि त्यांच्या समर्थकांना वेढा घालत ताब्यात घेतले. तुपकर यांना मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, या आक्रमक आंदोलनामुळे राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा विधानभवनाच्या दारात पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. हेही वाचा.. मोशी कचरा डेपो दुर्घटना:आतापर्यंत 9 जणांची सुखरूप सुटका, अद्याप 6 ते 7 जण अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत आज एक मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारी दुपारी अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा महाकाय डोंगर शेजारील प्रशासकीय इमारतीवर कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या ढिगाऱ्याखाली अनेक कर्मचारी अडकले होते. कालपासून सुरू असलेल्या युद्धपातळीवरील बचावकार्याला आता मोठे यश आले असून, आतापर्यंत एकूण ९ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, अद्यापही ६ ते ७ जण या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सविस्तर वाचा.. राज्यात पावसाचा जोर ओसरला:विदर्भात विश्रांती, तरीही पुणे-साताऱ्यासह 17 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना महत्त्वाचा इशारा गेले चार दिवस संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आज थोडा कमी झाला आहे. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आज पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी, धोका मात्र पूर्णपणे टळलेला नाही. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील १७ जिल्ह्यांसाठी धोक्याचा इशारा कायम ठेवला असून, यामध्ये २ जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' तर १५ जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. सविस्तर वाचा..