ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पत्रकार तुषार खरात यांची पोलिस कोठडी आज संपणार:अन्नत्यागामुळे खरात सलाईनवर, आज न्यायालयात हजर करणार
ॲट्रॉसिटी आणि पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी लय भारी वेब पोर्टलचे पत्रकार तुषार खरात (सध्या रा. मुंबई, मूळ रा. पांढरवाडी, ता. माण) यांच्यावर माण तालुक्यातील दहिवडी आणि वडूज पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात खरात यांना न्यायालयाने 3 दिवस पोलिस कोठडी दिली आहे. पोलिस कोठडीत खरात यांनी अन्नत्याग केल्याने ते सध्या सलाईनवर आहेत. कोठडीची मुदत संपणार असल्याने आज (गुरूवारी) त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शेखर सुरेश पाटोळे (रा. वडूज, ता. खटाव) यांनी तुषार खरात व अनोळखी दोघांविरुद्ध वडूज पोलिस ठाण्यात शनिवारी (8 मार्च) ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी तुषार खरात यांना मुंबईतून ताब्यात घेऊन अटक केली. या गुन्ह्यात न्यायालयाने खरात यांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या कोठडीची मुदत गुरुवारी (13 मार्च) संपत आहे. त्यामुळे आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले. न्यायालयानं पोलिस कोठडी दिल्यानंतर तुषार खरात यांनी अन्न घेण्यास नकार दिला. गेली दोन दिवस त्यांनी अन्नत्याग केलाय. त्यामुळे त्यांना अशक्तपणा असून ते सध्या सलाईनवर आहेत, अशी माहितीही पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली. तसेच उद्या त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याचंही सोनवणे यांनी सांगितलं. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी थांबवायची असेल तर ५ कोटी रुपयांची खंडणी द्या, अन्यथा आणखी महिलांकडून खोटे गुन्हे दाखल करायला सांगेन, अशी धमकी तुषार ऊर्फ तात्यासो आबाजी खरात यांनी माझ्या कार्यकर्त्याला मुंबईत बोलावून दिल्याची तक्रार स्वतः मंत्री गोरे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे. तुषार खरात हे माण विधानसभा मतदारसंघातील रहिवासी आहेत. आपल्याबद्दल सोशल मीडियावर त्यांनी मानहानीकारक व बदनामीकारक पोस्ट केल्या आहेत. माझे कार्यकर्ते बळवंत पाटील यांना मुंबईत बोलावून घेतले. जयकुमार गोरे यांना मिटवून घ्यायला सांगा. अन्यथा त्यांचे मंत्रिपद मी घालवणार आहे. मिटवायचे असेल तर मंत्री गोरे यांना 5कोटी रुपये द्यायला सांगा, असं खरात कार्यकर्त्याला म्हणाल्याचं मंत्री गोरे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे.
तुषार खरात यांना झालेल्या अटकेचा मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मीडिया परिषदेनं तीव्र निषेध केला आहे. आम्ही माध्यमांची मुस्कटदाबी खपवून घेणार नाही, असा इशाराही पत्रकार परिषदेनं दिला आहे. तुषार खरात यांनी केलेल्या बातम्यांवरून चिडून मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. खरात यांनी खोट्या बातम्या दिल्या असतील तर त्यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करता येऊ शकतो. मात्र, त्याऐवजी गंभीर गुन्हे दाखल करून माध्यमांवर दहशत निर्माण करायची आहे. हे आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा मराठी पत्रकार परिषदेच्या एस. एम. देशमुख यांनी दिला आहे.