फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीसाठी उभारलेल्या २६ एमएलडी (दशलक्ष लिटर रोज) क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी गेल्या ३ दिवसांपासून सुरू होती. ती शुक्रवारी रात्री यशस्वीपणे पूर्ण झाली. त्यामुळे १५ ऑगस्टपूर्वी शहराला ९०० मिमी जलवाहिनीतून अतिरिक्त २६ एमएलडी पाणीपुरवठा सुरू केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी दिली. त्यामुळे शहरात आता ४ दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. शहरासाठी केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत २’ योजनेतून नवीन पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. यामध्ये २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. ही योजना पूर्ण होण्यास वेळ लागणार असल्याने ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्यासाठी फारोळा येथे उभारलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी घेतली. आता पाण्यात क्लोरिन, तुरटीचे प्रमाण किती असावे, हे ठरवण्यात येणार आहे. सध्या ९०० मिमी जलवाहिनीतून २० एमएलडी, तर जुन्या ७०० आणि १२०० मिमी जलवाहिन्यांतून ११८ एमएलडी असे १३८ एमएलडी पाणी मिळते. त्यामुळे सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करावा लागतो. मात्र, आता ९०० मिमी जलवाहिनीतून अतिरिक्त २६ एमएलडी पाणी मिळाल्यास शहरवासीयांना ४ दिवसांआड पाणी देता येईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील आठवड्यातही पाणीपुरवठ्यात खंड नवीन जलवाहिनीतून ७५ एमएलडी पाणी मिळेल, पण ७०० मिमीची जलवाहिनी बंद केल्याने ५० एमएलडी पाणी कमी होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त २५ ते २६ एमएलडी पाणीच मिळणार आहे. या कामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत असून,अनेक भागांचे वेळापत्रक कोलमडले आहे. पुढील आठवड्यातही पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे..