हिंगोली जिल्ह्यात 13 हजार 900 महिलांना कॅन्सर?:संजीवनी अभियानांतर्गत 3 लाख महिलांचे सर्वेक्षण, आरोग्य विभाग सतर्क
हिंगोली जिल्ह्यात 13 हजार 900 महिला कॅन्सर संशयित असल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात संजीवनी अभियानांतर्गत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्यामोर्फत 3 लाख महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महिलांना नेमका कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे, या संदर्भातील पुढील तपासणी करून या महिलांवर योग्य ते उपचार केले जाणार आहेत. या संदर्भात हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल दिलेल्या माहितीनुसार, महिलांमध्ये प्रामुख्याने गर्भपिशवीचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर आणि मुखाचा कॅन्सर हे तीन प्रकारचे कॅन्सर आढळून येतात. त्यानुसार हे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. 13900 संशयित महिलांचा लवकरच आता तपासण्या केल्या जाणार असून कॅन्सर झालेल्या महिलांवर लवकरच उपचार सुद्धा केले जाणार आहेत, अशी माहिती गोयल यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले, जिल्ह्यातील महिलांमध्ये कॅन्सरचे काही लक्षणे असतील तर त्याचे निदान करण्यासाठी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त संजीवनी अभियान सुरू केले होते. या अभियानांतर्गत तब्बल 3 लाख महिलांची आपण आशा सेविकांच्यामार्फत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार 13900 महिलांना संबंधित लक्षणे आढळून आली आहेत. त्यामुळे आता 13900 महिलांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. तसेच त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. आशा सेविकांच्या माध्यमातून डोअर टु डोअर स्क्रीनिंग करण्यात आले होते. तसेच त्यांना प्रश्नावली तयार करून ट्रेनिंग देण्यात आली होती. पुढे बोलताना जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले, लक्षणे आढळून आलेल्या या महिलांची यादी तयार करण्यात आली आहे. तसेच स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात या भागातील महिलांमध्ये आढळून आल्याची माहिती या सर्वेक्षणातून समोर आली आहे. दरम्यान, कर्करोग होऊ नये यासाठी सावधगिरी म्हणून एचपीव्हीची लस जिल्ह्यातील सर्व मुली आणि महिलांसाठी देण्याबाबत तालुकास्तरावर शिबिरे आयोजित करावीत. त्यासाठी आठ दिवसात रूपरेषा तयार करा, अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी जिल्हा शल्य चिकित्सक तालुका आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत.