4 हजार पाळीव हत्तींचे गेल्या 20 वर्षात काय झाले?:कुठे आहेत लॉग बुक्स? ‘माधुरी’ हत्तीणीचे अश्रू कोण पुसणार? विश्वास पाटलांचा सवाल 4 हजार पाळीव हत्तींचे गेल्या 20 वर्षात काय झाले?:कुठे आहेत लॉग बुक्स? ‘माधुरी’ हत्तीणीचे अश्रू कोण पुसणार? विश्वास पाटलांचा सवाल

4 हजार पाळीव हत्तींचे गेल्या 20 वर्षात काय झाले?:कुठे आहेत लॉग बुक्स? ‘माधुरी’ हत्तीणीचे अश्रू कोण पुसणार? विश्वास पाटलांचा सवाल

कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वनताराकडे सोपवण्यात आले. यावेळी हत्तीणीला निरोप देताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत ग्रामस्थ भावूक झाले. तसेच याला विरोध देखील करण्यात आला. माधुरी हत्तीणीची वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणूक काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने देखील माधुरी हत्तीणीबाबतची याचिका फेटाळली व त्यानंतर माधुरीला वनताराकडे देण्याचा निर्णय देण्यात आला होता. याला अनेकांनी विरोध दर्शवला असून आता लेखक विश्वास पाटील यांनी देखील यावर आक्षेप घेत ट्विट केले आहे. विश्वास पाटील म्हणाले, मौर्य काळापासून हत्ती जंगल सोडून माणसांच्या आणि विशेषत: मुलांच्या सहवासात आले. भारतीय सर्कशी, धार्मिक मठ आणि साधू संन्याशांनी आपल्या पोटाला चिमटे देऊन या ऐरावतांचे संगोपन केले होते. पण स्वतःला प्राणिमित्र समजणारे आणि आपल्या आईबापांना वृद्धाश्रमांचा रस्ता दाखवणारे काही महाभाग मानव आणि प्राणिमात्रांच्या युगानुयुगांच्या मैत्री आड आले. त्यातूनच कोर्टबाजीचा आधार घेऊन या हृदयशुन्य मंडळींनी प्राणी प्रेमाचा तमाशा मांडला. तो फारसा चांगला नाही. 1998 च्या दरम्यान भारतात मोठ्या ऐंशी सर्कशी होत्या. त्यामध्ये कमला नावाची केरळ मधील एक सर्कस ही तीन रिंगची होती. या एका सर्कशीत एका वेळी 104 हत्ती होते. सर्कसवाले पोटाला चिमटा देऊन वाघ, सिंह आणि हत्तींचे सुद्धा संवर्धन व संगोपन करत. सांगा बरं, आमच्याकडच्या एका सर्कशीतील वरील फोटोतील हत्ती हे दुबळे किंवा तुमच्या कायद्याच्या भाषेत दुर्लक्ष केलेले आहेत का? तेव्हा एखाद्या सर्कस कंपनीकडून काही वेळा प्राण्यांना इजा पोचली असेल. पण तशा एखाद दुसऱ्या घटनेचा फायदा घेऊन प्राणी संगोपनावर आणि संवर्धनावर कोर्ट हुकूमचा आधार घेऊन बंधने आणली गेली. रस्ते अपघातात सुद्धा दरवर्षी काही लाख माणसे मृत्यू पावतात. म्हणून काय उद्या हायवे बंद करणार आहात का? मी माझ्या “द ग्रेट कांचना सर्कस” या नव्या कादंबरीच्या निमित्ताने या विषयाचा गेली दहा वर्षे अभ्यास करतो आहे. त्यातून मला हे जाणवले की, पाळीव प्राण्यांना जनमानसांपासून ह्याच प्राणी मित्रांनी दूर पळवले. इसवी सन 2000 च्या दरम्यान चार हजाराहून अधिक हत्ती कोर्टाच्या आदेशाचा आधार घेऊन ताब्यात घेतले गेले होते. त्यांना या प्राणी मित्रांनी स्वतः कधी एक बादलीभर पाणी सुद्धा कधी पाजले नाही. त्यांना फॉरेस्ट गार्डच्या ताब्यात दिले. त्यावेळी हे फॉरेस्ट गार्ड हत्ती, वाघासारख्या प्राणी संगोपनाचे तज्ज्ञ होते काय? ह्या साऱ्या दुर्दैवाचा परिणाम म्हणून भारतामध्ये काही हजार हत्ती, वाघ आणि सिंह सुद्धा सरकारी कस्टडीमध्ये मृत पावले आहेत. शिवाय मठामध्ये आणि सर्कशीमध्ये होणारे या प्राण्यांचे नवे जनन व संगोपन पूर्ण थांबले आहे. या साऱ्या अवनीतीला कोण जबाबदार ? कायद्याच्या पळवाटा शोधणाऱ्या विद्वानांचे संघटित गट निर्माण होणे हा सुद्धा नव्या दादागिरीचा व व्हाईट कॉलर गुंडगिरीचा भाग आहे. या प्राणीमात्रांमुळे पन्नास-पन्नास किलोमीटरवर प्रवास करून सुद्धा आज साधा घोडा आमच्या मुलांना दाखवता येत नाही. हे लोक समाजाला घेऊन कुठे चालले आहेत याचा विचार होणे आवश्यक आहे. या मंडळींची हिंमत असेल तर त्यांनी आजवर झालेल्या देशभरातील कोर्टाचे आदेश आणि त्यानुसार फॉरेस्टच्या ताब्यात दिलेले हे सर्व प्राणी आणि त्यांचे आज काय हाल झाले आहेत किंवा किती कमी कालावधीत ते बिचारे प्राणी तिकडे मृत पावले याची आकडेवारी जाहीर करावी . हत्तीच्या बाबतीत बोलायचे तर हत्तीचे आयुष्य 60 ते 65 वर्षे किमान असते. तर मग सांगा प्राणी मित्रांनो आणि मानवी शत्रूंनो या चार हजार हत्तींचे काय झाले ? इतर वेळी माहितीच्या अधिकाराचा टेंभा मिरवता तर त्या प्रत्येक प्राण्याची माहिती द्या बरं, अशी मागणी विश्वास पाटील यांनी केली आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *