राज्य सरकारने हिंदी सक्तीचे शासन निर्णय रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर 5 जुलै रोजी नियोजित ठाकरे गट आणि मनसेचा मोर्चा ‘विजयी मेळावा’ म्हणून साजरा केला जाणार आहे. मात्र, या विजयी मोर्चावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार टीका करत हा उत्सव म्हणजे “शैक्षणिक हत्येचे तांडव” असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मनसेवर “विद्यार्थ्यांची हत्या करणारी सेना” अशी कठोर टीका केली असून, राज आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण गल्लीपुरते व दळभद्री आहे, असेही म्हटले. राज्य सरकारने शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट आणि मनसे यांनी 5 जुलै रोजी संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, सरकारने या दोन्ही वादग्रस्त शासन निर्णयांना आता रद्दबातल ठरवले आहे. त्यामुळे ठाकरे गट व मनसेतर्फे हा नियोजित मोर्चा रद्द करत त्याऐवजी 5 जुलै रोजी विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या विजयी मेळाव्यावर टीकास्त्र सोडले आहे. नेमके काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले की, स्वतःच्या सोयीच्या राजकारणासाठी चालवलेले ही कुभानड आहे. महाराष्ट्रात श्रीमंत विरुद्ध गरीब असा एक लढा मागील काही दिवसांमध्ये सुरू झाला आहे. या बाबीला मराठी विरुद्ध हिंदी असा रंग देण्यात आला. सगळ्यांना आवाहन करत आहेत या विषयावर चळवळ उभी करा. गरीब आणि श्रीमंत हा विचारांची खांडोळी करणाऱ्यांविरोधात चळवळ उभी करा. शासनाला मुस्कटदाबी करून निर्णय रद्द करायला लावला. संविधान धोक्यात आहे असे लोकसभेला सांगितले, त्याचप्रमाणे आता मराठी संदर्भात मत तयार केले. मराठीला खतरा आहे अस सांगत ही सरकारची गळचेपी केली. वातावरण गढूळ होऊ नये म्हणून सरकारने शासन निर्णय रद्द करत आहोत असे सांगितले. मनसे ही विद्यार्थ्यांची हत्या करणारी सेना हा लढा गरीबांचा आहे. भटके विमुक्त, शेतकऱ्यांचा, वंजारी समाजाचा, तमाम ओबीसींचा आहे. जे अवघड काम करतात अशा कष्टकऱ्यांची लेकरं कोणत्या शाळेत जातात? जे उच्चभ्रू आहे त्यांचा प्रश्न नाही. अनेक अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना क्रेडिट मार्क बघितले जातात. उद्धव आणि राज ठाकरे यांची मूळ ज्या शाळेत शिकले, त्या शाळेत तीन भाषा शिकवल्या जातात. शैक्षणिक नुकसानाची भरपाई केली जाऊ शकत नाही. एकीकडे श्रीमंतांना 12 क्रेडिट आणि गरिबांना 7 क्रेडिट हा असमतोल आहे. हे राज ठाकरे यांनी करायला लावलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही विद्यार्थ्यांची हत्या करणारी सेना आहे. शिक्षणापासून वंचित ठेवणारी सेना म्हणजे मनसे. हा टुकार पण आहे, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली. 5 जुलैचा मेळावा म्हणजे शैक्षणिक हत्येचे तांडव मनसे-ठाकरे गटाच्या विजयी मोर्चाबाबत सदावर्ते म्हणाले की, तुम्ही जो काही उत्सव साजरा करणार आहात पण हा उत्सव म्हणजे शैक्षणिक हत्या करून तांडव करायला निघाला आहात त्या बाबीचा गंभीर निषेध करतो. जो उत्सव साजरा करण्यात येणार आहे तो दिवस काळ्याकुट्ट अक्षरात नोंद होईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण दळभद्री आहे. गल्लीच्या निवडणुकांसाठी हे सगळे सुरू आहे. राज ठाकरे यांची वळवळ फार टिकणारी नाही. राज ठाकरे यांच्या रोगाला कुठेतरी थांबवावे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.