मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाविरोधात राज्यभरात एल्गार पुकारण्यात आला आहे. शेतकरी नेते राजू शेट्टींकडून 1 जुलैला रास्ता रोकोची हाक देण्यात आली आहे. तसेच लोकप्रतिनिधी आणि साखर कारखानदारांनी शक्तिपीठ विरोधी भूमिका स्पष्ट करावी की, तुमचाही 50 हजार कोटींत वाटा आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवाय शक्तिपीठ रत्नागिरी-नागपूर महामार्गास समांतर असून, 50 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी या महामार्गाचा अट्टाहास असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला. शक्तिपीठ महामार्गाला नुकतीच कॅबिनेटमधून मंजुरी मिळाल्यानंतर राज्यभरात या प्रकल्पाविरोधात जोरदार एल्गार सुरू झाला आहे. कोल्हापूर आणि सांगलीसह तब्बल 12 जिल्ह्यांतून या महामार्गाला तीव्र विरोध होत आहे. शेतकरी संघटनांपासून ते विविध राजकीय संघटनापर्यंत अनेकांनी एकत्र येत या प्रस्तावित प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महामार्गांचे मॅप दाखवत सरकारवर टीकास्त्र डागले आहे. नेमके काय म्हणाले राजू शेट्टी? महाराष्ट्रातील जनतेवर 86 हजार कोटीचा बोजा टाकणारा शक्तिपीठ महामार्ग हा रत्नागिरी -नागपूर या महामार्गास समांतर आहे. या दोन्ही महामार्गातील कमीत कमी अंतर 2 किलोमीटर व जास्तीत जास्त अंतर 30 किलोमीटर आहे. यासंदर्भात राजू शेट्टी यांनी दोन्ही महामार्गांचे मॅप देखील दाखवले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांतून जाणारे दोन्ही महामार्ग कसे समांतर आहेत, हे या नकाशावरून दिसून येईल, असे राजू शेट्टी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. …म्हणून ‘शक्तिपीठ’चा अट्टाहास भविष्यात गरज पडल्यास सध्या असणारा रत्नागिरी नागपूर महामार्ग चौपदरी ऐवजी सहा किंवा आठ पदरी करणे सहज शक्य असताना आता शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी? 50 हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठीच, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर केला आहे. 1 जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात राजू शेट्टी यांनी उद्या (1 जुलै) शेतकरी दिनी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली येथील पंचगंगा पुलावर रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनामध्ये हजर आणि संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. लोकप्रतिनिधी, कारखानदारांना इशारा दरम्यान, राजू शेट्टी यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तसेच साखर कारखानदारांनी शक्तीपीठ विरोधी भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन करत, काळ आपल्याला माफ करणार नाही असा इशारा दिला आहे. तुमच्या मिशीला खरकटे लागले नसेल तर तुम्हाला सरकारला घाबरण्याची काहीच गरज नाही. निवडणुकीपूर्वी तुम्ही या संदर्भात पत्र दिले होते आणि आता तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही.