मुंबईमध्ये सापडल्या 6500 किलोच्या चांदीच्या विटा:दुसऱ्या प्रकरणात आढळली 1 कोटीची रोकड

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे सापडत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. आता मुंबईच्या विक्रोळी येथे एका कॅश व्हॅनमध्ये ६५०० किलो चांदीच्या विटा सापडल्या आहेत. विक्रोळी पोलिसांनी व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. या विटा मुलुंड येथील एका गोदामात नेण्यात येत होत्या. निवडणूक आयोग व पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.
भुलेश्वर येथेदेखील १ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मुंबईतील भुलेश्वर प्रकरणात पाच लोक संशयितरीत्या बॅग घेऊन जात होते. ही रक्कम कोणाची आहे याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी या पाचही जणांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. याबरोबरच या प्रकरणात आयकर विभागाला पाचारण करण्यात आले आहे. मुंबईनंतर पुणे येथेदेखील दोन ठिकाणी रोकड सापडली होती. या प्रकरणी आरोपींना अटकदेखील करण्यात आली आहे.
या घटनांवर रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी वादग्रस्त विधान केलेे. अनेक ठिकाणी लावलेल्या पोलिस बंदोबस्तात कोट्यवधी रुपये पकडले जात आहेत. हे पैसे अडवू नका, राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचारातून कोट्यवधी रुपये कमावले असून लोकांचे पैसे लोकांपर्यंत पोहोचू द्या, असे त्यांनी म्हटलेे. तसेच उरण मतदारसंघात पैशांचा पाऊस पडणार असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे.

  

Share