निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत सापडल्या चांदीच्या विटा:6500 किलोच्या या विटा विक्रोळीत पकडल्या गेल्या, 5 जणांना अटक

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे सापडत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. तसेच आता मुंबईच्या विक्रोळी येथे एका कॅश व्हॅनमध्ये 6500 किलो चांदीच्या विटा सापडल्या आहेत. विक्रोळी पोलिसांनी व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेल्या या विटा एकूण साडेसहा टन इतक्या असल्याचे समोर आले आहे. यांची किंमत कोटींच्या घरात आहे. या विटा मुलुंड येथील एका गोदामात नेण्यात येत होत्या. निवडणूक आयोग व पोलिस याचा अधिक तपास करत आहेत. मुंबईमध्ये याआधी देखील अनेक ठिकाणी पैशांचे घबाड सापडले असल्याचे समोर आले आहे. भुलेश्वर येथे देखील 1 कोटी 32 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. मुंबईतील भुलेश्वर प्रकरणात पाच लोक संशयितरित्या बॅग घेऊन जात होते. ही रक्कम कोणाची आहे, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी या पाचही जणांना पोलीस ठाण्यात आणण्यात होते. याबरोबरच या प्रकरणात आयकर विभागाला पाचारण करण्यात आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर सातत्याने अशी रोकड सापडत असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईनंतर पुणे येथे देखील दोन ठिकाणी रोकड सापडले होते. या प्रकरणी आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. पुण्यात सुरुवातील खेड-शिवापूर प्लाझाजवळ पोलिसांच्या नाकाबंदीत पोलिसांना बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. ज्या गाडीत ही रोकड सापडली होती ती शहाजी नलावडे यांची होती व हे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांचे सहकारी असल्याची चर्चा होती. दरम्यान, या घटनांवर रायगड कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी वादग्रस्त विधान केले आहे. निवडणुकीमुळे अनेक ठिकाणी लावलेल्या पोलिस बंदोबस्तात करोडो रुपयांची माया पकडली जात आहे. मात्र हे पैसे आडवू नका, राजकीय नेत्यांनी भ्रष्टाचारातून करोडो रुपये कमविले असून लोकांचे पैसे लोकांपर्यंत पोहोचू द्या, असे त्यांनी म्हणले आहे. तसेच उरण मतदारसंघात पैशांचा पाऊस पडणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

  

Share