मुख्यमंत्री शिंदेंच्या खात्यात 74 कोटींचा घोटाळा:आदित्य ठाकरे यांचा पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप

युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तसेच त्यांच्या नगरविकास खात्यावर गंभीर आरोप केले आहेत. नगरविकास खात्यात जवळपास 74 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, एमएमआरडीए मधील घोटाळा मी तुमच्यासमोर मांडणार आहे. हा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यातील घोटाळा आहे. आपल्याला माहीत आहे की मेट्रोची अनेक कामे मुंबईमध्ये चालू आहेत, एमएमआरमध्ये सुरू आहेत आणि हे कामे अजूनही काही ठिकाणी पूर्ण झालेली नाहीत. तुमच्या लक्षात आले असेल की वर मेट्रोचे काम पूर्ण होण्याआधी त्याच्या पिलर्सला रंगवून टाकण्यात आले आहे. म्हणजे काम पूर्ण होण्याआधीच फिनिशिंगचे काम केले जात आहे. पण या सगळ्या रंगरंगोटीच्या कामांना किती खर्च लागला आहे. तर यासाठी एक पत्र आहे एमएमआरडीएचे पत्र 26/12/2022 चे आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे, काम पूर्ण होण्याआधी फिनिशिंगचे काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात 4/10/2024 या तारखेला एस्केलेशनसाठी मान्यता मिळाली. तुम्ही मला सांगा अर्धवट बांधकामांवर कोणी रंगरंगोटी करते का? यासाठी जवळपास 74 कोटी 41 लाख 92 हजार 179 रुपये वापरण्यात आले आहेत. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, म्हणजे यांना बीएससीला द्यायला पैसे नाहीत, जुनी पेन्शन योजनाचे पैसे द्यायला पैसे नाहीत, दिवाळी बोनससाठी पैसे नाहीत, पगार द्यायला पैसे नाहीत, सोयाबीनला 7 हजार पैसे नाहीत, कापसासाठी पैसे नाहीत. मग हे एस्केलेशनचे पैसे नेमके कशासाठी, कोण देत आहे आणि हा घोटाळा नाही तर मग काय आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. आमचे सरकार 23 तारखेला बनणार आहे, महाविकास आघाडीचे सरकार 23 तारखेला बनल्यानंतर या सगळ्या घोटल्यांची चौकशी आम्ही करणार आहोत आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करु, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, अर्धवट काम असेल तर रंगरंगोटी का करता? बीकेसीच्या तिथून जी मेट्रो जाते, ती देखील अर्धवट आहे, लाइन 6 असेल ती देखील अर्धवट आहे, मग रंगरंगोटी करण्याची गरज काय आहे? स्वच्छता मी समजू शकतो पण एवढे मोठे कॉंट्रॅक्ट एस्केलेशन देऊन 74 कोटींचे एस्केलेशन. हे जनतेचे पैसे आहेत, यांच्या खोक्यातले पैसे नाहीत.

  

Share