गोवा; 20 लाख पर्यटकांच्या स्वागतासाठी तयार:प्रथमच सिडनीसारखी आतषबाजी, नाताळ… सेंट फ्रान्सिस दशवार्षिक पार्थिव दर्शन सोहळा!
सध्या मी जगप्रसिद्ध गोव्यातील थिरकत्या बागा किनारी आहे. सूर्यास्त होतोय. समुद्राच्या लाटा उसळत आहेत. धमाकेदार लाइव्ह म्युझिक सुरू झाले आहे. डिस्कोथेकवरील हिपहॉप, रॉक, पॉप, भारतीय संगीतासह पार्ट्या रंगल्या आहेत. देश-विदेशातील पर्यटक संगीताच्या तालावर नाचू लागले आहेत. अंधार दाटू लागताच सुमारे १० किमीच्या समुद्रकिनाऱ्यावरील रंगीबेरंगी प्रकाश जणू एका वेगळ्याच विश्वात रूपांतरित होत असल्याचे जाणवते. ही तर केवळ सुरुवात आहे. येथे नवीन वर्षाची जोरदार तयारी सुरू आहे. उत्तर व दक्षिण गोव्यात १३५ किनारे आहेत. ३५० सरकारीसह खासगी मालकीचे ७०० शॅक्स (रेस्तराँ, बार, दुकाने) आहेत. येथे खाणे-पिणे, जल्लोषाची सर्व व्यवस्था आहे. बागा, कलंगुट, कॅडोलिम, अंजुना, वागाटोरसह प्रत्येक किनाऱ्यावर पर्यटकांचा सागर दिसतो. बागा येथे १००, कलंगुट-५०, पालोलेम-३०, कँडोलिम येथे २० हून जास्त शॅक्स आहेत. येथील लाइव्ह म्युझिकसारखे कार्यक्रम समुद्राच्या लाटांनाही थिरकायला लावत आहेत. गोव्यातील हॉटेल, रेस्तराँ नवीन वर्षासाठी विशेष ऑफर व पॅकेज घेऊन स्वागतासाठी सज्ज आहेत. यात कपल पॅकेज, ग्रुप पॅकेज, हनिमून पॅकेज, फॅमिली पॅकेज इत्यादी समाविष्ट आहे. ब्रिटन, इटली, जर्मनी व अमेरिकेसह अनेक देशांतील पर्यटकांचा आेघ सुरूच आहे. चार्टर्ड प्लेननेही पर्यटक येत आहेत. उशिरा रात्री सीफूडचा आनंद घेणारे स्क्रीफन म्हणाले, अमेझिंग एक्स्पीरियन्स. ते पंधरा दिवस गोव्याच्या समुद्रकिनारी अशी मौज करतील. नवीन वर्षाची भटकंती ऑल गोवा शॅक्स असोसिएशनचे अध्यक्ष क्रूज कोरडोजो म्हणाले, नवीन वर्ष साजरे करण्यासाठी १८-२० लाख देश-विदेशातील पर्यटक गोव्यात येतील. यंदा आतषबाजी चांगल्या प्रकारे डिझाइन केली जात आहे. ३१ रोजी मध्यरात्री समुद्रावर सिडनीच्या हार्बर ब्रिजसारखे दृश्य दिसेल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी १० सेकंदांचा काउंटडाऊन असेल, मग आतषबाजी दिसेल. आेल्ड गोवा चर्चही चर्चेत आहेत. येथे विशेष कार्यक्रम एक्स्पोझिशन (सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे दर्शन) अंतर्गत नाताळनिमित्त ख्रिश्चन भाविकही मोठ्या संख्येने येथे येत आहेत. हा दशवार्षिक पार्थिव दर्शन सोहळा आहे. तो ४ जानेवारीपर्यंत चालेल. सनबर्न गोवा म्युझिक फेअर २८ डिसेंबरपासून तीन दिवस चालेल. त्यात जगभरातील संगीतप्रेमी सहभागी होतील. नवीन वर्षापर्यंत गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचा उत्साह आेसंडून वाहू लागेल. यंदा नवे वर्ष कुठे साजरे करणार?… त्याचे उत्तर तुमच्याकडे असेलच. नसले तरी हरकत नाही. कारण भास्कर या मालिकेत देशातील निवडक ठिकाणांची सैर घडवून आणेल. प्रत्येकाला नवीन वर्ष साजरे करायला आवडेल अशी ही ठिकाणे.आम्ही येथील तयारीच्या माहितीस शब्दांच्या माध्यमातून तुमची मुशाफिरी घडवून आणू. चला, दुसऱ्या भागात जाऊया जिंदादिल गोव्यात!