राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार असून त्याला राज्यातील सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. आता या मोर्चाच्या नियोजनासाठी मनसेच्या वतीने बाळा नांदगावकर तर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने संजय राऊत यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्याबरोबरच आमदार वरुण सरदेसाई, आणि संदीप देशपांडे यांच्यावर देखील महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्रि-भाषा सुत्राच्या माध्यमातून हिंदी सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप ठाकरे बंधूंनी केला आहे. या विरोधात आता एकत्र मोर्चा काढण्यात येणार आहे. 5 जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या या मोर्चाची जबाबदारी मनसेच्या वतीने ज्येष्ठ नेते बाळ नांदगावकर तर शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबरोबरच आमदार वरुण सरदेसाई आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर देखील मोर्चाच्या नियोजनाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल तर केवळ मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांचा हा मोर्चा असेल, असे मनसेने आधीच जाहीर केले आहे. राज ठाकरे मार्ग बदलणार की, उद्धव ठाकरे गिरगाव चौपाटीला येणार? वास्तविक राज ठाकरे यांनी केलेला नियोजनानुसार गिरगाव चौपाटीपासून आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारक ते आझाद मैदान मोर्चा काढावा, असे सुचवले आहे. त्यामुळे आता या मोर्चाच्या मार्गावरुन आणि वेळे वरून अद्याप एकमत झालेले नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने कोणत्याही आंदोलनाची सुरुवात ही हुतात्मा चौकातूनच केली जाते. त्यामुळे आता राज ठाकरे आपला मार्ग बदलणार की, उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या नियोजनाप्रमाणे गिरगाव चौपाटीपासून सुरू होणाऱ्या मोर्चात सहभागी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वेळ आणि सोयीचा मार्ग, या संदर्भात नेते चर्चा करतील – संजय राऊत दुसरीकडे संजय राऊत यांनी या विषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला टोलवले आहे. हुतात्मा चौकातून मोर्चा काढावा, असे उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ठरले होते. मात्र त्यासोबतच गिरगाव चौपाटी येथून मोर्चाला सुरुवात करावी, असा देखील पर्याय आमच्या बैठकीत चर्चेला होता, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. वेळ आणि सर्वांना सोयीचा मार्ग, या संदर्भात बैठकीत बसून नेते चर्चा करतील, असे देखील संजय राऊत यांनी सांगितले आहे. 20 वर्षांनंतर दोघे भाऊ एकत्र गेल्या वर्षी विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे या सख्ख्या चुलत बंधूंनी एका छताखाली यावे, असे प्रयत्न दोन्ही पक्षांच्या काही पदाधिकाऱ्यांकडून सुरू होते. मात्र, एकत्र येण्यासाठी ठोस मुद्दा दिसत नव्हता. तो अखेर हिंदी विरोधाच्या निमित्ताने तो मुद्दा मिळाला. इयत्ता पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा ऐच्छिक म्हणूनही शिकवता कामा नये अशी भूमिका या भावंडांनी घेतली आणि 20 वर्षांनंतर हे दोघे एकत्र येऊन 5 जुलै रोजी हिंदी सक्ती विरोधात मुंबईत मोर्चा काढणार आहेत. शरद पवार, हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार आधी राज ठाकरे 5 जुलैला तर उद्धव ठाकरे 7 जुलैला मोर्चा काढणार होते. मात्र, बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेऊन उद्धव यांनी उद्धवसेनेचा 7 जुलैचा मोर्चा रद्द करून 5 जुलैच्या राज ठाकरे यांच्या मोर्चात सहभागी होण्याचे ठरवले. अपेक्षेनुसार शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे स्वागत केले, त्यानुसार ते देखील या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.