पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून काढण्यात येत असलेल्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ही केवळ राजकीय भूमिका आहे असे मी म्हणणार नाही. कोणाच्याही समोर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतका वेगळ्या पद्धतीने विरोध झाला नसता. असा दावा फडणवीस यांनी केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे माझे चांगले मित्र आहेत. म्हणून काय झाले? मात्र त्यांच्या काही भूमिका आहेत. तर माझ्या काही भूमिका आहेत. सर्वांच्या सारख्या भूमिका असत्या तर सर्व एका पक्षात राहिले असते. त्यामुळे भूमिका वेगळ्या असू शकतात. मात्र उद्धव ठाकरे यांनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि आता त्याच्या विरोधात ते बोलताय, तर याचा अर्थ केवळ राजकीयच आहे. या राज्यात माशेलकर, मुणगेकर, सुखदेव थोरात यांच्यासारख्या लोकांवर प्रश्नचिन्ह लावता येईल का? असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे. देवेंद्र फडणवीस यांना राजकारण करायचय, त्यामुळे देवेंद्र फडणवीस काहीतरी करतोय. मात्र या लोकांना देखील राजकारण करायचे आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अशा लोकांनी जर एखादा रिपोर्ट दिला आणि तो तुम्ही स्वीकारला आहे. आता तुम्ही त्यालाच विरोध करता? याचा अर्थ मराठीचा प्रेम नाही तर राजकारण असल्याचा स्पष्ट आरोप देखील फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. परकीय भाषा चालते मग भारतीय हिंदी का चालत नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयामागचे कारणही सांगितले. यामागे एक सायंटिफिक प्रोसेस आहे. या प्रोसेस मध्ये आपले विद्यार्थी पुढे कसे गेले पाहिजे, या दृष्टिकोनातून तयार केलेले त्रिभाषा सूत्र आहे. ते तयार करत असताना विद्यार्थ्यांची बुद्धी सर्वात जास्त कधी चालते, भाषा शिकण्याची शक्यता कधी अधिक असते. या संदर्भातले रिसर्च करून त्या कालावधीमध्ये त्यांना भाषा शिकवल्या तर ते अधिकच्या भाषा शिकू शकतात, अशा प्रकारचा मुद्दा समोर आला. हा आमच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय नाही. कुठलीही भाषा शिका, हिंदीच शिकली पाहिजे असे नाही. हे आम्ही एका मिनिटात सांगितले. हिंदी सक्तीला यांचा विरोध नाही तर यांचा विरोध केवळ हिंदीला आहे. भारतामध्ये तुम्हाला इंग्रजी चालते, तीला तुमचा विरोध नाही. परकीय भाषा चालते मग भारतीय हिंदी का चालत नाही? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. त्रिभाषा शिकवण्यामागचे खरे कारण मराठी आणि हिंदी कॉम्पिटिशन झाली तर पहिली मराठीच निवडली जाईल. मराठी सोबत कोणतीही कॉम्पिटिशन नाही. मात्र त्याचवेळी आमच्या मुलांना तीन भाषा शिकायच्या आहे. तीन भाषा शिकले नाही तर नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे क्रेडिट मिळणार नाही. नवीन भाषा न शिकल्यामुळे मराठी विद्यार्थ्यांचे क्रेडिट कमी होणार आहे. त्यामुळे चांगले मार्क घेऊन देखील राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये मराठी विद्यार्थ्याचा नंबर लागणार नाही. हे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना मागे ओढण्यासारखे आहे. हा मुद्दा भावनेपेक्षा वस्तुस्थिती समजून घ्यायचा राज्यातील संस्थांमध्ये ॲडमिशन तुम्ही ठरवाल. मात्र राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये सर्व निवड सिईटीने होत आहे. यात आपण मराठी मुलांचे नुकसान करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. हा मुद्दा भावनेपेक्षा वस्तुस्थिती समजून घ्यायचा आहे, असे आवाहन देखील त्यांनी केले. सत्तेत असताना वस्तुस्थिती समजून घ्यायची, कमिटी तयार करायची, त्यांचा रिपोर्ट स्विकारायचा, आणि विरोधी पक्षात गेल्यानंतर भूमिका बदलायची? अशा शब्दात विविध फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. गुजरातमध्येही तिसरीपासून हिंदी भाषा महाराष्ट्रातील काही विद्वानांनी गुजरातमध्ये तिसरी भाषा शिकवली जाते का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, गुजरात राज्यामध्ये देखील तिसऱ्या वर्गापासून हिंदी भाषा शिकवली जात आहे. हिंदीला त्यांनी संस्कृत आणि इतर भाषांचे देखील पर्याय दिलेले आहेत. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भाषेवरून गुजरातकडे बोट दाखवणाऱ्या नेत्यांना देखील प्रत्युत्तर दिले आहे.