महायुतीतील पक्षांमध्ये श्रेयवादावरून सततच खसखस सुरू असते. वेळ मिळताच एकमेकांवर टोलवाटोलवी केली जाते. असाच एक प्रसंग शनिवारी नागपुरात एका कार्यक्रमात पाहायला मिळाला. यावेळी भाषण करताना शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात व्यासपीठावरून अप्रत्यक्ष शाब्दिक चकमक रंगली. निधी माझ्या विभागाने दिला, पण श्रेय विदर्भातील नेत्यांना मिळत आहे. त्यामुळे श्रेयवाद कसा करायचा हे आपण शिकलो, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी टोलेबाजी केली. नागपुरातील विधी महाविद्यालयात संविधान उद्देशिका पार्कचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच विधी महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर येण्यापूर्वी सर्व नेते आणि मान्यवर विधी महाविद्यालयातील एका रूममध्ये बसले होते. रूममध्ये घडलेला किस्सा संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात सांगितला. नेमके काय म्हणाले संजय शिरसाट? संजय शिरसाटांनी आपल्या भाषणात थेट फडणवीसांवर लक्ष्य साधत एक मजेशीर पण बोचरा टोला लगावला. ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस कार्यक्रमाआधी आम्ही बसलेल्या खोलीत आले आणि म्हणाले की, ही खोली आता पाडणार आहोत. मग मला वाटले की त्यांना आपल्यानंतर इथे दुसरे काही निर्माणच होऊ नये असे वाटतंय काय? श्रेयवाद कसा घ्यायचा हे शिकलो पण एवढ्यावरच शिरसाट थांबले नाहीत. त्यांनी पुढे सांगितले, इथल्या कामासाठी माझ्या विभागाने ही निधी दिला, मात्र सर्वजण बावनकुळेंचे कौतुक करत आहे. इथे सर्व विदर्भातील नेते असून ते एकोप्याने वागले. त्यामुळे श्रेयवाद कसा घ्यायचा आपण इथे शिकलो, अशी कोपरखळी संजय शिरसाट यांनी लगावली. शिरसाटांच्या विधानावर फडणवीसांचे स्पष्टीकरण काही वेळाने फडणवीस भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांनी संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, हो, ती खोली पाडणार आहोत, पण यामागे आकस नाही, तर नव्या इमारतीचे काम आहे. संजय शिरसाटांनी अर्धसत्य सांगितले आहे. विधी महाविद्यालयासाठी नव्या इमारतीची गरज आहे, म्हणून मी ते बोललो. या टोलेबाजीनंतर व्यासपीठावरच वातावरण काहीसे संमिश्र होते. पण पुढे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे काम कोणत्याही एका विभागाचे नसून सर्व विभागांच्या सहभागातून झाले असल्याचे नमूद करत परिस्थिती मवाळ करण्याचा प्रयत्न केला. महायुतीतील श्रेयवादाचा संघर्ष पुन्हा उघड या घटनाक्रमावरून महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जाहीर कार्यक्रमातच एकमेकांवर टोलेबाजी केली जात असल्यामुळे श्रेयवादाचा विषय केवळ अंतर्गत बैठकीपुरताच सीमित न राहता, तो जनतेसमोर उघडपणे येऊ लागला आहे. हे ही वाचा… हिंदी सक्ती हा भाजप, RSS चा अजेंडा:त्यांना सर्व प्रादेशिक भाषा संपवून हिंदी ही एकच भाषा ठेवायची आहे, काँग्रेसचा मोठा आरोप राज्यात पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय हा भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा व कुटिल डाव आहे. त्यांना अनुसूची 8 मधील सर्वच भाषा संपवून हिंदी ही एकमेव भाषा देशात ठेवायची आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला. गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच का? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. पूर्ण बातमी वाचा…