मुंबईत राहताय, तर मराठी बोलले पाहिजे:हिंदी भाषा वादावर सुनील शेट्टीचे विधान, म्हणाला – मराठी येत नसल्यास स्वतःला वाईट वाटले पाहिजे मुंबईत राहताय, तर मराठी बोलले पाहिजे:हिंदी भाषा वादावर सुनील शेट्टीचे विधान, म्हणाला – मराठी येत नसल्यास स्वतःला वाईट वाटले पाहिजे

मुंबईत राहताय, तर मराठी बोलले पाहिजे:हिंदी भाषा वादावर सुनील शेट्टीचे विधान, म्हणाला – मराठी येत नसल्यास स्वतःला वाईट वाटले पाहिजे

मुंबईसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि बहुरंगी शहरात राहणाऱ्यांनी मराठी भाषा शिकावी, तिचा सन्मान करावा, असा स्पष्ट आणि संवेदनशील संदेश अभिनेता सुनील शेट्टी याने दिला आहे. भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर त्याने घेतलेली ही भूमिका केवळ मार्मिकच नव्हे, तर अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरते आहे. मुंबई ही आपली कर्मभूमी आहे आणि इथली मराठी भाषा शिकणे, ती बोलणे हे आपले कर्तव्य असल्याचेही तो म्हणाला. सुनील शेट्टी आज शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचला होता. साई दर्शनानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्याने राज्यात हिंदी भाषा सक्तीवरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देत मराठी भाषेविषयी मोठे भाष्य केले. तसेच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील कलाकारांना भारतात बंदी घालावी, अशी भूमिकाही त्याने मांडली. नेमका काय म्हणाला सुनील शेट्टी? आज अनेक दिवसांनंतर साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. दरवर्षी साईंच्या दर्शनासाठी येत असतो. मात्र मध्यंतरीच्या काळात साईबाबांचं बोलावणे आले नव्हते. आज साईबाबांचे बोलावणे आल्याने साईबाबांच्या दर्शनासाठी आलो. माझी पत्नी वर्षातून दोन वेळा शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत असते. आज साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मनाला समाधान वाटले आणि आनंद झाला. लवकरच सहपरिवार साईबाबांच्या दर्शनासाठी येणार असल्याचे सुनील शेट्टी म्हणाला. मुंबई कर्मभूमी, मराठी आलीच पाहिजे मराठी विरुद्ध हिंदी वादावर बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, मी मुंबईत राहतो. माझी जन्मभूमी जरी कर्नाटक असली तरी कर्मभूमी मुंबई आहे. मला मराठी नाही आली तरी चालेल. पण मी जर मराठी बोललो तर तुम्हाला बरे वाटेल, सर्वांनाच बरे वाटेल. जर कर्मभूमीत राहून मी मराठी बोललो नाही तर त्याचा दुसऱ्यांना नाही तर स्वतःला त्रास झाला पाहिजे. मराठी येत नाही याबद्दल स्वतःला वाईट वाटले पाहिजे. इथे राहून मराठी शिकायचे आहे, असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. जसे इतर लोक मराठी बोलतात, तसे मराठी आपल्यालाही बोलता आले पाहिजे. पाकिस्तानातील कलाकारांना भारतात बंदी घाला दरम्यान, पहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील कलाकारांना भारतात बंदी घालावी अशी ठाम भूमिका पहिल्यापासूनच मी मांडत आलो असल्याच शेट्टी याने म्हटले. मी सुरुवातीपासून म्हणतोय की, ज्या लोकांमुळे आपल्या देशाला त्रास होतो. अशा लोकांशी कोणतेही संबंध ठेवू नयेत. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानातील कलाकारांना भारतात बंदी घातली पाहिजे. केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर क्रिकेट, राजकारण, व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रांमध्ये पाकिस्तानशी संबंध तोडले पाहिजेत. भारत-पाकिस्तानमधील वातावरण शांत होत नाहीत तोपर्यंत संबंध ठेवले नाही पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका सुनिल शेट्टीने मांडली.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *