पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्याचे माजी आमदार, शिक्षणमहर्षी म्हणून ओळखले जाणारे कृष्णराव भेगडे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते काही काळापासून आजारी होते आणि उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मावळ परिसरात त्यांचे कार्य अतिशय प्रभावी आणि बहुआयामी होते. त्यांनी केवळ आमदार म्हणून नव्हे तर शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी असलेल्या उदारमतवादी नेतृत्व म्हणून समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. कृष्णराव भेगडे यांचा राजकीय प्रवास 1970 च्या दशकात सुरू झाला. त्यांनी भारतीय जनसंघाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि नंतर जनता पार्टी, काँग्रेस, व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काम केले. दोन वेळा मावळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या भेगडे यांनी स्थानिक पातळीवर विकास कामांना गती दिली. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख शिक्षणाच्या माध्यमातून झाली. त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मावळ परिसरात विविध शाळा, महाविद्यालये सुरू केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली केली. त्यांचा हेतू होता की “शिक्षण हीच खरी समृद्धीची गुरुकिल्ली आहे”, आणि हाच विचार त्यांनी आयुष्यभर जपला. त्यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अनेक उपक्रम राबवले गेले. त्यामध्ये शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या योजना, गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, महिला शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये, तसेच तंत्रशिक्षण व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे यांचा समावेश होता. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आजही हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतात. पिंपरी-चिंचवड आणि मावळ या भागात त्यांच्यामुळे शिक्षणाची गंगा प्रवाहीत झाली आणि त्या पाण्याने अनेक कुटुंबे समृद्ध झाली आहेत. त्यामुळेच त्यांना “शिक्षणमहर्षी” ही पदवी समाजाने आपोआप बहाल केली. शेतकरी संघटनांमध्ये सक्रिय कृष्णराव भेगडे हे केवळ शिक्षक किंवा शिक्षणसंस्था चालक नव्हते, तर ते एक द्रष्टे समाजसुधारक होते. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षणाबरोबरच आरोग्य, शेती, सहकार आणि सामाजिक न्याय क्षेत्रातही काम केले. त्यांनी मावळमधील अनेक गावांना रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सेवा या मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. शेतकरी संघटनांमध्ये सक्रिय राहून त्यांनी शेतीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा सहकार क्षेत्रातील अनुभव व्यापक होता, त्यांनी पतसंस्था, सहकारी बँका आणि दूध संघांच्या माध्यमातून आर्थिक समृद्धीची दिशा दाखवली. मावळचे स्थानिक प्रश्न राज्याच्या मंचावर मांडले राजकीयदृष्ट्या ते स्वच्छ व सदाचारी नेते म्हणून ओळखले जात. सत्ता मिळवण्यासाठी कधीही खालच्या पातळीवर गेले नाहीत, नीतिमत्ता हीच त्यांची खरी ताकद होती. अनेक पक्षांमध्ये प्रवास करूनसुद्धा त्यांच्या प्रतिमेला कोणतीही धक्का लागली नाही. विधानसभेतील त्यांचे प्रश्न मांडण्याचे कौशल्य, मुद्देसूद भाषण, आणि विरोधकांनाही विचार करायला भाग पाडणारी शैली सर्वांनाच भावत असे. त्यांनी मावळच्या स्थानिक प्रश्नांना राज्याच्या मंचावर नेऊन त्याचे निराकरण केले. पाण्याचा प्रश्न, उद्योग वसाहती, शिक्षण संस्था यासाठी त्यांनी निधी मिळवून दिला.