महाराष्ट्र आणि शिवसेना, शिवसेनेचे वाघ अजून जीवंत आहेत, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. तसेच 5 तारखेला ठाकरे बंधू एकत्र येतील असेही त्यांनी सांगितले आहे. विजयी दिवसाचा सोहळा शिवतीर्थावर व्हावा, अशी इच्छा असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र आणि शिवसेना, शिवसेनेचे वाघ अजून जीवंत आहेत. बघा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. या तिघांनी महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सांगितले की आहोत आम्ही अजून, टायगर अभि जिंदा हें. 5 तारखेला मराठी विजय दिवस जो आहे त्याला आम्ही त्यांनाही बोलवणार आहोत. त्यांनी बघावे की मराठी एकजुटीने कसा विजय मिळवला. पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, शत्रूला कधीही प्रिय म्हटले पाहिजे. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले आहे की शत्रू हा तोलामोलाचा असला पाहिजे. आपण त्यांना दाखवून दिले आहे की महाराष्ट्राची एकजूट काय आहे. पापाचा द्वेष करा पाप्याचा करू नका, असा एक इंग्रजीत सुविचार आहे. संघर्ष करायला उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील, आम्हाला आवडते संघर्ष करायला. माझी राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. शिवतीर्थ येथे विजयी मेळावा व्हावा अशी आम्ही विनंती अर्ज देखील दिला आहे. त्याला अजून परवानगी देण्यात आलेली नाही सरकारकडून. त्यावर राज ठाकरे यांनी एका सभागृहाचा पर्याय सुचवला आहे. 5 जुलै रोजी 12 च्या सुमारास कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील. संजय राऊत म्हणाले, या लढ्यात जे सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी असेल, कॉंग्रेस असेल, डावे पक्ष असतील या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करू. कारण महाराष्ट्राची एकजूट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ही राजकीय पक्षाच्या पलीकडे असते. हे आम्हाला दिल्लीला दाखवून द्यायचे आहे की जेव्हा जेव्हा दिल्लीने अघोरी कायद्यांच्या आधारे किंवा सत्तेच्या आधारे हल्ले केले तेव्हा हा महाराष्ट्र अधिक ताकदीने उभा राहिला. हेच आम्हाला मोदी आणि शहा यांना दाखवून द्यायचे आहे. मोर्चा असो किंवा विजयी सभा असेल याचे आयोजन शिवसेना आणि मनसेच करत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे मिळूनच करत आहेत, याला दुर्लक्ष करता येत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही. जीआरच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका, असे फडणवीस यांना उद्देशून संजय राऊत म्हणाले.