मीरा रोडच्या शांती पार्क परिसरातील जोधपूर स्वीट्स अॅण्ड नमकीन या दुकानाच्या मालकाला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेचा तीव्र निषेध करत आज संपूर्ण मीरा भाईंदर मधील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आपला संताप व्यक्त केला. तसेच या मारहाण केल्यावरुन या व्यापाऱ्यांनी मार्च देखील काढला. ही घटना केवळ एका व्यक्ती पुरती मर्यादित न राहता भविष्यात कोणत्याही व्यावसायिकासोबत घडू शकते, अशी भीती व्यापाऱ्यामध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून आज शहरातील सर्व दुकाने बंद ठेवली. आम्ही मराठी भाषा तसेच महाराष्ट्राचा सन्मान करतो. मात्र, कोणीही मारहाण करु नये. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे या व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. ठाण्यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुजराती दुकानदाराला मारहाण केली होती. दुकानदाराने त्यांना फक्त मराठी बोलणे का आवश्यक आहे? असे विचारले होते. त्याला उत्तर देताना कार्यकर्ते म्हणाले की, हा महाराष्ट्र आहे, म्हणून येथे मराठी बोलावे लागेल. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर मंगळवारी पोलिसांनी काशिमीरा पोलिस ठाण्यात 7 मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रथम कार्यकर्त्यांनी दुकानदाराला धमकावले, नंतर मारहाण केली व्हिडिओमध्ये मनसेचे अनेक कार्यकर्ते दुकानदाराला घेरून त्याच्याशी वाद घालताना दिसत आहेत. एक सदस्य दुकानदाराला म्हणतो, ‘तू मला विचारले होते की मराठी का बोलावे? जेव्हा तुला काही अडचण आली तेव्हा तू मनसे कार्यालयात आलास.’ दुकानदाराने उत्तर दिले की त्याला माहिती नाही की आता मराठी बोलणे अनिवार्य झाले आहे. यावर, एक कार्यकर्ता दुकानदाराला शिवीगाळ करतो आणि त्याला इशारा देतो की त्याला या भागात व्यवसाय करू दिला जाणार नाही. जेव्हा दुकानदार म्हणतो की त्याला मराठी शिकावी लागेल, तेव्हा एक मनसे सदस्य म्हणतो, “हो, तेच सांगतोय. पण तू मराठी का शिकावे असे का विचारत आहेस? हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते?” जेव्हा दुकानदार म्हणतो- ‘सर्व भाषा’, तेव्हा एक माणूस त्याला थप्पड मारतो, नंतर दुसरा माणूस त्याला दोनदा मारतो. दुकानदार काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला आणखी चार वेळा थप्पड मारली जाते.