ठाण्यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुजराती दुकानदाराला मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेचा तीव्र निषेध करत आज संपूर्ण मीरा भाईंदर मधील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आपला संताप व्यक्त केला. तसेच या मारहाण केल्यावरून या व्यापाऱ्यांनी मार्च देखील काढला. मात्र, हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नसून भारतीय जनता पक्षाचा आरोप मनसेने केला आहे. या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी भाजपविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदरील प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला. मात्र, त्या आधी तो व्यापारी काय म्हणाला? ते समोर आलेले नाही. त्या व्यापाऱ्याने मजुरीची भाषा केली, त्यामुळे त्याला आधी हात जोडून विनंती केली. नंतर हात सोडून विनंती केली असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मराठी भाषेचा कोणत्याही प्रकारचा अपमान सहन करणार नसल्याचेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडणारच, अशी प्रतिक्रिया देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. मोर्चा व्यापाऱ्यांचा नाही तर भारतीय जनता पक्षाचा – अविनाश जाधव मीरा भाईंदर मधील मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नाही तर भारतीय जनता पक्षाचा असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. सदरील व्यापाऱ्याची आपण कालच भेट घेतली होती. त्यावेळी आमच्यात काय ठरले होते? हे ते त्या व्यापाऱ्यालाच विचारा, असे आवाहन देखील अविनाश जाधव यांनी केले आहे. मराठी माणसासाठी भाजप कधीच भूमिका घेत नाही. हा मोर्चा निघावा यासाठी सतत पाठपुरावा करणारा भारतीय जनता पक्षाचा कोणता नेता होता? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आजचा मोर्चा हा भारतीय जनता पक्ष प्रेरित होता आणि बळजबरीने व्यापारी यात सहभागी झाले होते, असे देखील जाधव यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने मराठी माणसाच्या विरोधात काढलेला हा मोर्चा असल्याचे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. तसेच हा मराठी माणसाचा अपमान असल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे. इतकेच नाही तर आम्ही देखील आगरी कोळी समाजाला घेऊन मीरा भाईंदर मधील मराठी माणसांना एक करून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे.