मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या वतीने मराठीच्या मुद्यावरून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून राज आणि उद्धव ठाकरे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या अधिकृत अकाउंटवर राज ठाकरे यांचा फोटो असलेले पोस्टर पोस्ट करण्यात आले आहे. मुंबईमध्ये होणारा विजयी मेळावा हा कोणत्याही पक्षाचा मेळावा नाही. त्यामुळे या व्यासपीठावर किंवा मेळावा परिसरात कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह असणार नाही. मात्र, या मेळाव्यातून पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातोय. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हेच असल्याचे खासदार संजय राऊत यांनी देखील म्हटले आहे. त्यामुळे व्यासपीठावर देखील केवळ प्रमुख नेत्यांनाच संधी दिली जाणार आहे. मेळाव्याचे मुख्य आकर्षण उद्धव-राज ठाकरे विजयी मेळावा पण पक्षाचे लेबल नाही अध्यादेश रद्द झाल्यानंतर पाच तारखेला मोर्चा ऐवजी विजयी मेळावा घेण्याचा निर्णय उद्धव आणि राज ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र, या मेळाव्याला कोणत्याच पक्षाचे लेबल नसेल. या विषयाला सर्वांनी पक्षाच्या पुढे जाऊन पाहिले पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. युती होतील, तुटतील मात्र मराठी भाषा एकदा तुटली तर ती परत येणार नाही. मराठी भाषेच्या माध्यमातून संस्कृती टिकून आहे. ती जर गेली, युती-आघाड्यांना काय अर्थ? असा प्रतिप्रश्न राज यांनी उपस्थित केला होता. निवडणुका आल्यानंतर युतीचा विचार करू. मात्र आता सध्या या सर्व गोष्टीकडे संकट म्हणून पहावे, त्याला राजकीय लेबल लावू नये, असे आवाहन राज यांनी केले होते. त्यानुसार हा मेळावा कोणत्याही पक्षाच्या लेबल शिवाय असणार आहे.