परभणी येथील संविधान शिल्प विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात आता पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा 16 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, त्याच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात आता पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. नेमके प्रकरण काय? परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा 16 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, त्याच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तसेच सोमनाथचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटले आहे. सोमनाथच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचेही अहवालातून पुढे आले आहे. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात होतीच. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात कुटुंबीयांची बाजू वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे मांडत आहेत. एका पोलिस अधिकाऱ्यासह 2 पोलिस कर्मचारी निलंबित परभणी हिंसाचार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला होता की, त्यांचा मृत्यू पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे झाला. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात सोमनाथ सूर्यवंशी (35) यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे उघड झाल्यानंतर, परभणीमध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह 2 पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. घटनेच्या सुमारे दोन महिन्यांनंतर ही कारवाई करण्यात आली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतली होती कुटुंबाची भेट गेल्या वर्षी 23 डिसेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणीला भेट दिली होती. त्यांनी मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. राहुल गांधी यांनी दावा केला होता की, सोमनाथ हे दलित असल्याने आणि संविधानाचे रक्षण करत असल्याने त्यांची पोलिस कोठडीत हत्या करण्यात आली. त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावरही या वेळी टीका केली होती. असा सुरु झाला हिंसाचार सर्व आंदोलन शांततेत सुरु असताना सुरुवातीला टायर जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर 300 ते 400 आंदोलक जमा झाले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड सुरू केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात म्हटले होते. वास्तविक घटना गंभीर असल्यामुळे परभणी मधील व्यापाऱ्यांनी स्वतः बंद पाळला होता. तरी देखील जमावाने बंद दुकानांची तोडफोड केली. गाड्यांची तोडफोड करण्यात आली, दुचाकी आणि टायर जाळण्याचे प्रकार केले. हे सर्व सुरू असताना पोलिसांनी तात्काळ बारा वाजता परभणी मध्ये 163 कलम नुसार जमावबंदी घोषित केली होती. मात्र, आंदोलनाची उग्रता वाढत असल्याने पोलिसांनी अश्रू धुराचा वापर केला, लाठी चार्ज केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. या माध्यमातून पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.